भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेली वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. २०१९च्या विश्वचषकातील पराभवानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. IPL 2020च्या माध्यमातून तो आता बहुप्रतिक्षित पुनरागमन करणार आहे. धोनी IPL चे अजून दोन हंगाम नक्की खेळेल असा विश्वास समालोचक संजय मांजरेकर याने व्यक्त केला होता. त्यानंतर आता CSKकडून धोनी कधीपर्यंत खेळणार? या प्रश्नाचं उत्तर संघाचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी दिलं आहे.

विश्वनाथन यांनी इंडिया टुडेला सांगितलं, “आम्ही धोनीच्या बाबतीत अजिबातच चिंता करत नाही. तो तंदुरूस्त आहे. धोनी पुढचे दोन्ही आयपीएल (२०२० आणि २०२१) तर खेळेलच. पण कदाचित त्या पुढच्या वर्षी म्हणजे २०२२च्या IPL स्पर्धेतही तो सहभागी होऊ शकतो.”

“धोनीचा सध्याचा दिनक्रम काय हे मला माहिती नाही. मी जे काही ऐकतो ते मला प्रसारमाध्यमांद्वारेच समजतं. तो झारखंडमध्ये इनडोअर नेटमध्ये प्रशिक्षण घेत आहे असं मी ऐकलं. सध्या आम्हाला आमच्या कर्णधाराबद्दल काळजी करण्याची काहीच गरज नाही. तो खेळण्यासाठी पात्र असेल की नाही याची आम्हाला मुळीच चिंता वाटत नाही. कारण त्याला त्याच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत आणि तो स्वत:ची व संघाची काळजी नक्की घेईल”, असेही विश्वनाथन यांनी स्पष्ट केलं.

“२०२० च्या टी२० विश्वचषकासाठी भारताचा जो संघ तयार करण्यात आला होता, तो संघ २०२१च्या विश्वचषकापर्यंत बऱ्याच प्रमाणात बदललेला असेल. माझ्या माहितीनुसार २०२१चा टी२० विश्वचषक खेळण्याआधी दोन IPL हंगाम खेळले जातील. ऋषभ पंतला टी २० विश्वचषकाच्या संघात आपली दावेदारी सांगण्यासाठी दोन IPL मिळतील. धोनीदेखील पुढचे दोन IPL नक्कीच खेळेल”, असं मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलं होतं.