पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा हुकुमी एक्का ठरेल असं अब्बास म्हणाले. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकाला रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक रवी शास्त्री साईबाबांच्या चरणी

“भारतीय संघात महेंद्रसिंह धोनी नावाचा एक हुशार खेळाडू आहे. एका अर्थाने भारतीय संघ त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्याकडे विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे, याचसोबत तो सामन्यात बदलणारी परिस्थिती लगेच ओळखतो. त्याचा अनुभव हा संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. भारतीय संघासाठी धोनी हा हुकुमाचा एक्का ठरेल.” अब्बास पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी अब्बास यांनी विराट कोहलीचंही कौतुक केलं. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला विश्वचषक असणार आहे, त्यामुळे आपलं नेतृत्व सिद्ध करुन दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असेल, असं अब्बास म्हणाले. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडिया विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना