भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्टला संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०१९च्या विश्वचषकात धोनीने आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याने २ महिन्यांची विश्रांती घेत भारतीय लष्करात सेवा दिली. पण त्यानंतर झालेल्या विविध वन डे आणि टी२० सामन्यांसाठी त्याचा विचार झाला नाही. तशातच IPL आणि टी२० विश्वचषक दोन्ही स्पर्धाही लांबणीवर पडल्या. त्यामुळे संघात पुनरागमन करता न आल्याने अखेर धोनीने निवृत्ती जाहीर केली. पण आता धोनीला निरोपाचा सामना खेळायला मिळणार की नाही, यावर BCCIच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

BCCIच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की BCCI धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करण्याचा विचार करत आहे. धोनी आता सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या IPL मध्ये खेळणार आहे. त्यावेळी BCCI त्याच्याशी निरोपाच्या सामन्याविषयी चर्चा करणार असून त्याप्रमाणे सामन्याचे आयोजन करणार आहे. “सध्या तरी कोणतीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका नियोजित करण्यात आलेली नाही. IPLनंतर कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांचे आयोजन सुरू केले जाईल. धोनीने भारतासाठी आणि टीम इंडियासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्याला त्याच्या वाट्याचा सन्मान मिळायलाच हवा. धोनीसाठी निरोपाचा सामना असायला हवा असं आम्हाला नेहमीच वाटत होतं, पण धोनी खूपच वेगळा खेळाडू आहे. कोणीही त्याच्या निवृत्तीच्या घोषणेबाबत विचार करत नसताना त्याने निवृत्ती जाहीर केली”, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

धोनीशी निरोपाच्या सामन्याबद्दल काही चर्चा झाली का? या प्रश्नाचे उत्तर देताना तो अधिकारी म्हणाला, “सध्या तरी आम्ही धोनीशी काहीही चर्चा केलेली नाही. पण IPLमध्ये आम्ही त्याचाशी चर्चा करणार आहोत. IPL हे त्याचं मत जाणून घेण्याचं उत्तम ठिकाण आहे. त्याच्या मनात निरोपाचा सामना किंवा मालिका याबद्दल काय विचार आहेत हे तिथे तो अधिक खुलून सांगेल अशी अपेक्षा आहे. धोनी काहीही म्हणाला तरी त्याच्यासाठी निरोपाचा एक चांगला सोहळा नक्कीच आयोजित केला जाईल. कारण तो भारतीयांचा आणि BCCIचा सन्मान असेल”, असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.