भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस होता. धोनीने वयाच्या ४०व्या वर्षात पदार्पण केले. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत धोनीने भारताकडून उपांत्य सामना खेळला. त्या पराभवानंतर धोनीला पुन्हा अद्याप संघातून खेळायची संधी मिळालेली नाही. धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा गेले १० महिने रंगताना दिसत आहे, पण धोनी अजूनही क्रिकेट खेळण्यास सक्षम आहे असे त्याची पत्नी साक्षी आणि चाहते दोघेही सांगताना दिसतात. ICC च्या तीनही महत्त्वाच्या ट्रॉफीजसह इतर अनेक स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीला सारेच यशस्वी कर्णधार मानतात, पण धोनीला हे यश नशिबामुळे आणि गांगुलीच्या मेहनतीमुळे मिळालं आहे, असं मत माजी फलंदाज गौतम गंभीर याने व्यक्त केले.

“कसोटी क्रिकेटमध्ये धोनी यशस्वी कर्णधार ठरला, त्याचं कारण होतं भेदक मारा करणारा गोलंदाज जहीर खान. जहीर हे धोनीला संघात मिळालेलं एक वरदान होतं. पण त्याला टीम इंडियामध्ये समाविष्ट करून घेणारा गांगुली होता. माझ्या मते जहीर खान हा भारताचा जगातील सर्वोत्तम गोलंदाज होता. धोनी खूपच नशिबवान कर्णधार होता. त्याला सगळ्या फॉरमॅटमध्ये तयार आणि सर्वोत्तम अशा खेळाडूंचा संघ मिळाला. २०११ च्या विश्वचषक संघाचे नेतृत्व करणं फारसं अवघड नव्हतं. संघात सचिन, सेहवाग, मी, युवराज, युसूफ, विराट सगळेच प्रतिभावंत खेळाडू होते. गांगुलीने या साऱ्यांना एकत्र घेऊन संघ घडवला आणि उभा केला. धोनीला मात्र तयार (रेडीमेड) संघ मिळाला आणि म्हणूनच त्याला एवढ्या साऱ्या ट्रॉफीज जिंकत्या आल्या”, असे स्पष्ट मत क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात गंभीरने मांडले.

“धोनी जर कर्णधार नसता, तर…”

“क्रिकेट जगताने एक मोठी गोष्ट गमावली. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद भूषवलं, त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला नाही. जर धोनी कर्णधार नसता, तर तो तिसऱ्या क्रमांकावरील एक उत्तम फलंदाज बनू शकला असता. क्रिकेट जगताला एक पूर्णपणे वेगळा आणि चांगला धोनी बघायला मिळाला असता. तिसऱ्या क्रमांकावर खेळल्याने त्याच्या खूप जास्त धावा झाल्या असत्या आणि खूप विक्रम मोडीत काढले असते. विक्रमांची बातच सोडा, ते तर मोडण्यासाठीच असतात. पण जर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळत असता तर त्याने चाहत्यांचे अधिक चांगले मनोरंजन केले असते”, असेही गंभीर एका कार्यक्रमात म्हणाला होता.