२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या संपूर्ण स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीचा संथ खेळ हा मुद्दा कायम चर्चेत राहिला. विश्वचषकानंतर निवड समितीने पहिल्यांदा मोठं पाऊल उचलत धोनीला विश्रांती देत, ऋषभ पंतला संधी दिली. पंतला मिळालेल्या संधीचा लाभ उठवता आला नसल्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये धोनीचे चाहते त्याला भारतीय संघात पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारण्याची तयारी केली असल्याचं समजतंय. Sportskeeda या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
धोनीने आपला परिवार आणि जवळच्या मित्रांना आपल्या निवृत्तीविषयी सांगितल्याचं कळतंय. मात्र आयपीएलमध्ये पुढील दोन हंगामतरी धोनी खेळणार आहे. “त्याने अद्याप बीसीसीआयशी कोणत्याही पद्धतीने अधिकृत बोलणी केलेली नाही. पण आपल्या जवळच्या लोकांशी बोलताना त्याने आपलं मन मोकळं केलंय. योग्य वेळ येताच तो आपली निवृत्ती जाहीर करेल”, धोनीच्या जवळील सुत्रांनी माहिती दिली. मात्र यंदाच्या हंगामातील आयपीएलबद्दल अंतिम निर्णय येईपर्यंत तो निवृत्तीचा निर्णय घेईल असं वाटत नाही असंही सुत्रांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, समालोचक हर्षा भोगले यांच्या मते धोनी आता भारताकडून खेळेल याची शक्यता कमी आहे. Cricbuzz संकेतस्थळच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना भोगले यांनी आपलं मत मांडलं. “माझं मन मला सांगतंय की धोनी आता भारताकडून खेळणार नाही. आगामी टी-२० विश्वचषकासाठी तो तयारी करत असेल असं मला खरंच वाटत नाही. केवळ आयपीएलचा हंगाम चांगला जावा ही त्याची इच्छा असू शकते. मात्र असं असलं तरीही त्याने आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत रहावं. आयपीएलमध्ये धोनी खेळत असताना त्याला पाठींबा देण्यासाठी हजारो चाहते मैदानावर, टिव्ही समोर असतात. त्यांच्याशी त्याचं भावनिक नातं निर्माण झालेलं आहे.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 29, 2020 8:37 am