महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबतच्या सर्व शक्यता भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सोमवारी फेटाळून लावले. धोनीच्या खराब फॉर्मचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर प्रसाद यांनी धोनी हा जगातला सर्वोत्तम यष्टीरक्षक असल्याचं आपण कसं काय विसरू शकतो, असं ते म्हणाले. धोनीने कसोटीतून निवृत्ती स्विकारल्यानंतर यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर धोनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्यानंतर निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली. पण धोनीने या सर्व शक्यता फेटाळून लावल्या.

प्रसाद म्हणाले की, ”निवड समितीला धोनीवर खूप विश्वास आहे. धोनीकडे आपण केवळ त्याच्या फलंदाजीच्या आकड्यांवरून का पाहातो? धोनीचे अव्वल दर्जाचे यष्टीरक्षण नेहमी झाकोळले जाते. धोनी संघाची अनमोल संपत्ती आहे. निर्णायक क्षणी त्याचा सल्ला नक्कीच मोलाचा ठरेल आणि विराटला धोनीसारख्या खेळाडूकडून मार्गदर्शन मिळणार असेल, तर यापेक्षा चांगली गोष्ट आणखी कोणती असू शकते.”

 

धोनीला पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंतचा विचार करण्याबाबतही यावेळी प्रसाद यांना विचारण्यात आले. ऋषभने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. सध्यातरी संघ समतोल असल्याने त्याला संधी मिळणं कठीण आहे. पण भविष्यात तो नक्कीच त्याच्याकडून खूप आशा आहेत. त्याला चिंता करण्याची काहीच गरज नाही, असेही एमएसके प्रसाद म्हणाले.