विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते, धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे अशी भावना व्यक्त करत, त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मागणी करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. IPL 2020 मध्ये धोनी आपल्या खेळीचा जलवा दाखवेल आणि झोकात टीम इंडियात पुनरागमन करेल अशाही चर्चा रंगल्या. पण दुर्दैवाने करोनामुळे IPL पुढे ढकलण्यात आले. या दरम्यान, धोनी कर्णधारच झाला नसता तर अधिक बरं झालं असतं, अशा आशयाचे विधान माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केले आहे.

“क्रिकेट जगताने एक मोठी गोष्ट गमावली. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद भूषवलं, त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला नाही. जर धोनी कर्णधार नसता, तर तो तिसऱ्या क्रमांकावरील एक उत्तम फलंदाज बनू शकला असता. क्रिकेट जगताला एक पूर्णपणे वेगळा आणि चांगला धोनी बघायला मिळाला असता. तिसऱ्या क्रमांकावर खेळल्याने त्याच्या खूप जास्त धावा झाल्या असत्या आणि खूप विक्रम मोडीत काढले असते. विक्रमांची बातच सोडा, ते तर मोडण्यासाठीच असतात. पण जर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळत असता तर त्याने चाहत्यांचे अधिक चांगले मनोरंजन केले असते”, अशी खंत गंभीरने क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात व्यक्त केली.

“फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर आताच्या गोलंदाजांच्या फळीसमोर धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर त्याने किती विक्रम मोडीत काढले असते याची गणतीच करता येणार नाही”, असेही गंभीर म्हणाला.