कोणत्याही क्रीडाप्रकारात खेळाडूंना आपली तंदुरुस्ती कायम राखण गरजेचं असतं. भारतीय क्रिकेट संघाचं व्यस्त वेळापत्रक पाहता, सर्व क्रिकेटपटूही आपल्या तब्येतीची आणि खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घेताना दिसतात. आतापर्यंत कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटसाठी आपला सर्वात आवडता पदार्थ चिकनचा कसा त्याग केला हे आपण जाणून आहोत. मात्र कोहलीसोबतच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा डाएट प्लान हा जाणून घेण्यासारखा आहे. २०१४ साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये अमुलाग्र बदल केले आहेत.

एकेकाळी आपल्या तगड्या आहारासाठी ओळखला जाणारा धोनी आता बटर चिकन, नान, मिल्कशेक, कोल्ड ड्रिंक यासारख्या वस्तुंना हातही लावत नाही. “होय आता माझ्या खाण्यांच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. ज्यावेळी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी बटर चिकन, मिल्कशेक, नान, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक यासारखे पदार्थ माझ्या खाण्यात असायचे. मात्र कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर मी आता कबाब, ब्रेड यासारख्या गोष्टी खायला लागलो आहे.” मुंबईत एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना धोनी म्हणाला.

विराट कोहली हा आपल्या आहारात हिरव्या भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ, उकडलेला बटाटा, ग्रिल्ड चिकन असे पदार्थ खातो. मात्र धोनी सध्या क्रिकेट सामन्यांदरम्यान व्यायामाकडे जास्त लक्ष देतो. मात्र स्पर्धा संपल्यानंतर धोनी व्यायामाकडे फारसं लक्ष देत नाही. धोनी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीबद्दल बोलत होता. सध्या भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे, यानंतर भारतीय संघ आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. यावेळी धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.