१९ डिसेंबरला आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. यंदा कोलकाता शहरात हा लिलाव पार पडेल. चेन्नई सुपरकिंग्ज संघ आगामी हंगामासाठी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली सज्ज झाला आहे. चेन्नईचा संघ आयपीएलच्या इतिहासातला यशस्वी संघापैकी एक मानला जातो. कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं नेतृत्व हेच चेन्नईच्या यशामागचं खरं कारणं असल्याचं मत, माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलं.
“चेन्नईच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा असतो. सलामीला त्यांच्याकडे फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनचा पर्याय आहे. यानंतर मधल्या फळीत अंबाती रायुडू आणि सुरेश रैनासारखे खेळाडू आहेत. धोनीला आपल्या संघात प्रयोग करायला आवडतात. त्याचं नेतृत्व हेच चेन्नई सुपरकिंग्जच्या यशाचं खरं गमक आहे. जर त्याने मागच्या हंगामाप्रमाणे कामगिरी केली, तर चेन्नईसाठी हे फायदेशीर ठरु शकतं.” मांजरेकर Start Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
चेन्नई सुपरकिंग्जने आगामी हंगामासाठी सॅम बिलिंग्ज, डेव्हिड विली, मोहीत शर्मा, ध्रुव शौरी आणि चैतन्य बिश्नोई यांना करारमुक्त केलं आहे. आगामी हंगामासाठी चेन्नईकडे सध्या १४.६० कोटी इतकी रक्कम शिल्लक आहेत. त्यामुळे आगामी हंगामासाठी चेन्नई कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 3:50 pm