न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात भारताला ४ धावांनी पराभूत व्हावे लागले. या पराभवाबरोबर भारताने मालिका २-१ अशी गमावली. या पराभवामुळे टीम इंडियाकडून न्यूझीलंडमध्ये पहिलीवहिली टी २० मालिका जिकंण्याची संधी निसटली. मात्र असे असले तरी या सामन्यात यष्टीरक्षक धोनीने आपली स्टम्पिंगची पुन्हा एकदा छाप उमटवली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचे सलामीवीर टीम सिफर्ट आणि काॅलीन मुनरो हे तडाखेबाज खेळी करत होते. या दोघांनी ७.४ षटकांत ८० धावा तडकावल्या होत्या. अखेर कुलदीप यादवची गोलंदाजी आणि त्याला धोनीच्या जलद स्टम्पिंगची साथ यामुळे ही जोडी फोडण्यात भारताला यश आले. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्याने सिफर्टला माघारी धाडले.

धोनीने केलेले स्टंपिंग हे केवळ ०.०९९ सेकंदात केले होते. 3G, 4G च्या जमान्यात धोनीने आपण अधिक चपळ असल्याचे दाखवून दिले आणि विद्युत वेगाने टीम सिफर्टला यष्टीचीत केले. कुलदीपच्या कारकिर्दीतील ही १८वी यष्टीचीत विकेट होती.

केवळ ०.०९९ सेकंदात केलं स्टंपिंग

 

दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ४ धावांनी मात केली. न्यूझीलंडने दिलेल्या २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ २०८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीत ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत न्यूझीलंडला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अखेरीस तोकडेच पडले. त्याआधी, सलामीवीर टीम सिफर्ट आणि कॉलिन मुनरो यांची भक्कम सुरुवात आणि मधल्या फळीत कर्णधार विल्यमसन, कॉलीन डी-ग्रँडहोम यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने २१२ धावांपर्यंत मजल मारली होती.