भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे त्याचे क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या मैदानावरील त्याचे क्षेत्ररक्षण सर्वोत्कृष्ट मानले जाते. जडेजा हा आतापर्यंतचा भारताचा आणि जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचे म्हटले जाते. रवींद्र जडेजा सध्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. काल सोमवारी चेन्नईने राजस्थानविरुद्ध सहज विजय नोंदवला. या सामन्यात जडेजाने कमाल करत 4 झेल टिपले.

जडेजाच्या या कारनाम्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे 8 वर्षांपूर्वीचे एक ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धोनीचे हे जुने ट्विट पुन्हा एकदा परत आले आहे, कारण त्याने जडेजाबद्दल काही सांगितले होते. 13 एप्रिल 2013रोजी धोनीने जडेजाविषयी ट्वीट केले होते, की सर जडेजा झेल घेण्यासाठी धावत नाहीत, तर चेंडू त्याला मैदानावर शोधतो आणि त्याच्या हातात जाऊन विसावतो.

ms dhonis old tweet reemerges as ravindra jadeja took four catches against rajasthan
धोनीचे 8 वर्षांपूर्वीचे ट्विट

 

चेन्नईचे दमदार पुनरागमन

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल हंगामात 2021मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिला सामना गमावला. त्यानंतर चेन्नईने शानदार पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकले आहेत. चेन्नईने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. चेन्नईने राजस्थानला 45 धावांनी मात दिली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सुरेश रैना, फाफ डु प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या.

चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून जोस बटलर (49) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. 20 षटकात राजस्थानला 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी दमदार गोलंदाजी करत राजस्थानचे कंबरडे मोडले. अलीला सामनावीर पुरस्कार मिळाला. राजस्थानचा हा लीगमधील दुसरा पराभव ठरला. विशेष म्हणजे, चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा हा 200वा सामना होता.