रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत मुंबईने दिल्लीवर ५ गडी राखून मात केली. कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक आणि इशान किशनने मधल्या फळीत केलेली फटकेबाजी हे संघाच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. इशान किशनने यंदा मुंबईकडून खेळत असताना चांगलंच प्रभावित केलं. युएईतील मैदानांवर जोरदार फटकेबाजी करत किशनने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांच्या मते किशन हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार झाला असून तो वन-डे आणि टी-२० संघात धोनीची जागा घेऊ शकतो.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर धोनी वर्षभर क्रिकेट खेळलेला नाही. धोनीच्या अनुपस्थितीत निवड समितीने ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची संधी दिली, परंतू वर्षभरात पंतने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाने आता लोकेश राहुल आणि संजू सॅमसनचा पर्याय वापरायचं ठरवलं आहे. “इशान किशनसारख्या छोट्या चणीच्या खेळाडूला फटकेबाजी करताना पाहणं खरंच आश्वासक आहे. यंदाचा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी चांगला गेलाय. सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर आणि जिथे गरज असेल तिकडे सलामीला येऊनही त्याने आपल्यातले गुण सिद्ध केले आहेत. संघाला गरज असेल त्याप्रमाणे आपल्या फलंदाजीत बदल करुन खेळ करण्याच्या त्याचं कौशल्य वाखणण्याजोगं आहे. त्यामुळे भारतीय संघात टी-२० आणि वन-डे संघात त्याला धोनीच्या जागेवर स्थान मिळू शकतं.” प्रसाद टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

जर तो अशाच पद्धतीने यष्टीरक्षण करुन फलंदाजी करु शकणार असेल तर भारतीय संघात त्याला नक्कीच जागा मिळेल. २०१८ साली झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी ६.२ कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या तेराव्या हंगामात इशान किशनने ५१६ धावा केल्या. संघात रोहित शर्मा नसताना सलामीला तर रोहित शर्मा आल्यानंतर मधल्या फळीत…अशा प्रत्येक ठिकाणी इशान किशनने आपली छाप पाडली आहे. त्यामुळे इशान किशनसाठी भारतीय संघाची दारं आता उघडली जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.