‘वन मॅन आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला 4-0 अशी धूळ चारत जर्मनी संघाने स्पर्धेत दमदार सुरूवात केली आहे.
जर्मनीचा म्युलर सामन्याचा हिरो ठरला. म्युलरने तीन शानदार गोल केले तर दुसऱया बाजूला सांघिक कामगिरीचा ‘फ्लॉप शो’ झाल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या स्टार खेळाडूची ‘रोनाल्डो’गिरी पहायला मिळाली नाही.
सामन्याच्या बाराव्या  मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकच्या रुपाने थॉमस म्युलरने गोल करत जर्मनीसाठी खाते उघडले त्यानंतर कॉर्नर किकवरून मिळालेल्या संधीने जर्मनीच्या हुम्मेल्सने अप्रतिम हेडर मारून गोल नोंदविला.
सामन्यात फुटबॉल सर्वात जास्त जर्मनीच्या खेळाडूंकडे फिरकताना दिसला पोर्तुगालकडून सुमार कामगिरी सुरू होती. त्यात पोर्तुगालच्या पेपे या खेळाडूने जर्मनीच्या थॉमस म्युलरशी हुज्जत घालून संघाच्या प्रतिमेवर चिखल उडविण्याचे काम केले. पंचांनी पेपे याला रेड कार्ड दाखवून बाद केले आणि पुढील तीन सामन्यांसाठी बंदीची कारवाई पेपेवर करण्यात आली. त्यानंतर म्युलरने दोन दमदार गोल करून पोर्तुगाल संघाला जशास तसे उत्तर दिले.
सामन्यात दोन फ्री-किकच्या स्वरूपात पोर्तुगाल संघाकडेही गोल करण्याच्या संधी चालून आल्या होत्या परंतु, रोनाल्डोला यावेळी संधीचे सोने करता आले नाही. सरतेशेवटी जर्मनीने पोर्तुगालचा 4-0 असा धुव्वा उडवला
सामनावीर- थॉमस म्युलर (जर्मनी), 3 गोल