News Flash

मुंबई शहर, ठाणे बाद फेरीत

घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करत ठाणे संघाने राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गुरुवारी सर्वाचे लक्ष वेधले. प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा मिळालेल्या पुरुष गटाच्या रोमहर्षक लढतीत ठाण्याने कोल्हापूरवर

| December 7, 2013 02:30 am

घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करत ठाणे संघाने राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गुरुवारी सर्वाचे लक्ष वेधले. प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा मिळालेल्या पुरुष गटाच्या रोमहर्षक लढतीत ठाण्याने कोल्हापूरवर १२-११ अशी निसटती मात केली. ठाण्यातील विकास कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत यजमान ठाण्यासह मुंबई शहर, मुंबई उपनगर यांनी बाद फेरीत आगेकूच केली. जितेश जोशी, प्रशांत चव्हाण आणि गिरीश इर्नाक यांच्या शानदार खेळाच्या जोरावर ठाण्याने हा विजय मिळवत बाद फेरीत आगेकूच केली. याआधीच्या लढतीत ठाण्याने लातूरचा ४४-२८ असा पराभव केला. याचप्रमाणे मुंबई शहरने साताऱ्यावर ३६-२५ असा विजय मिळवला. मुंबईच्या विजयात सागर कुऱ्हाडे, प्रदर्शन किरवे  चमकले.
महिला गटात बलाढय़ मुंबई शहरने औरंगाबादचा ५९-१४ असा धुव्वा उडवला. रेखा सावंत आणि विनिता पवार विजयाच्या शिल्पकार ठरल्या. याचप्रमाणे मुंबई उपनगरने अहमदनगरवर ६७-१० अशी आरामात मात केली. मीनल जाधव, राजश्री पवार यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. पुण्याने रायगडवर ५२-१४ असा दणदणीत विजय मिळवला. पुण्याकडून स्नेहल शिंदे, दीपिका जोसेफ यांनी दिमाखदार खेळ केला. ठाणे संघाला उपनगरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र बुधवारी अहमदनगरवरच्या एकतर्फी विजयाच्या जोरावर ठाण्याने बाद फेरी गाठली.

बाद फेरी गाठणारे संघ :
पुरुष गट – अ : सांगली, नंदुरबार, ब : मुंबई शहर, सातारा, क : रायगड, धुळे, ड : ठाणे, कोल्हापूर, इ : सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, फ : रत्नागिरी, पुणे
महिला गट – अ : पुणे, कोल्हापूर, ब : उपनगर, ठाणे, क : मुंबई शहर, सांगली, ड : रत्नागिरी, नाशिक किंवा सातारा.

..त्यामुळे संघांची माघार!
ठाण्यात सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेतील पुरुष गटात २२ आणि महिला गटात १५ संघांनीच उपस्थिती राखल्यामुळे सर्वत्र आश्चर्य प्रकट करण्यात येत आहे. अनुपस्थित असलेल्या संघांमध्ये प्रामुख्याने मराठवाडय़ामधील जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशने कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी सांगितले की, ‘‘स्पध्रेच्या तारखा आधी वेगळ्या ठरल्या होत्या. परंतु कार्यक्रमात बदल करून त्या पुढे आणण्यात आल्या. त्यामुळे संघांचा पुरेसा सराव होऊ शकला नाही. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत बरेच जण येतात. अनेक खेळाडूंच्या पालकांनीही गर्दीच्या प्रसंगी स्पध्रेबाबत नाराजी प्रकट केली. त्यामुळे हे संघ स्पध्रेत सहभागी होऊ शकले नाही.’’
दिलीप शिंदे यांचा हृदयविकारामुळे मृत्यू
रत्नागिरीच्या पुरुष संघाचे व्यवस्थापक दिलीप शिंदे यांचे गुरुवारी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रत्नागिरीने बाद फेरीत स्थान मिळवल्यानंतर मैदानाच्या परिसरातच त्यांना हृदयविकाराचा झटका बसला. परंतु इस्पितळात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे कबड्डीविश्वात शोककळा पसरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:30 am

Web Title: mumbai and thane in last round
टॅग : Kabaddi
Next Stories
1 सिंधू संस्कृती!
2 भारतीय संघ पुनरागमन करील- ए बी डीव्हिलियर्स
3 ‘फिफा विश्वचषकाच्या यजमानपदामुळे देशातील फुटबॉलचा चेहरामोहरा बदलेल’
Just Now!
X