आनंदा पाटीलच्या चौफेर चढायांमुळे महिंद्रा आणि महिंद्राच्या जेतेपदाच्या आशा बळावल्या होत्या. परंतु मुंबई बंदरने अखेपर्यंत जिद्दीने किल्ला लढवत पांचगणी व्यायाम मंडळाच्या अमृत महोत्सवी राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेतील व्यावसायिक पुरुषांच्या विजेतेपदावर नाव कोरले. महिलांमध्ये मुंबईच्या शिवशक्ती संघाने उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीला हरवून अजिंक्यपद पटकावले.
पुरुषांच्या अंतिम फेरीत शिवराज जाधवच्या पल्लेदार चढायांच्या बळावर मुंबई बंदरने पहिल्या सत्रात १३-६ अशी आघाडी मिळवली, तेव्हा हा सामना एकतर्फी होण्याची शक्यता होती. मात्र आनंदाला हे नामंजूर होते. दुसऱ्या सत्रात महिंद्राने गुण वाढवण्याचा सपाटा लावला. मात्र निर्णायक क्षणी मुंबई बंदरने हिमतीने लोण पडू दिला नाही. त्यामुळे २०-१७ अशा फरकाने त्यांनी सामना जिंकला.
महिलांमध्ये शिवशक्ती आणि महात्मा गांधी या संघांमधील विजयाची चुरस अखेपर्यंत टिकून होती. शिवशक्तीने मध्यंतराला ५-४ अशी आघाडी घेतली, ती टिकवत १०-८ अशी बाजी मारली. शिवशक्तीच्या अपेक्षा टाकळ व सोनाली शिंगटे यांनी अप्रतिम खेळ केला.
स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मोमीन शेख (मुंबई बंदर) व तृप्ती सोनावणे (महात्मा गांधी) यांना मिळाले. आनंदा पाटील (महिंद्रा) व अपेक्षा टाकळे (शिवशक्ती) सर्वोत्तम चढाईपटू ठरले, तर सतीश वडार (बीईजी) व सायली केरिपाळे (राजमाता) सर्वोत्तम पकडपटू ठरले.
व्यावसायिक संघांच्या वृत्तीवर पांचगणीकर नाराज
महिंद्रा आणि महिंद्रा, बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, मुंबई बंदर, बँक ऑफ इंडिया, महावितरण या कंपन्यांच्या संघांनी पंचांच्या निर्णयांवर वारंवार आक्षेप घेत पांचगणीच्या दर्दी कबड्डीरसिकांचा रोष पत्करला. त्यामुळे चाहत्यांनी या संघांची हुर्यो उडवली. यापैकी काही सामन्यांत पंचांवर धावून जाण्याचे प्रकारसुद्धा घडले. याबाबत स्पध्रेचे संयोजक राजेंद्र राजपुरे यांनी नाराजी प्रकट केली. महिलांचे सामने खिलाडूवृत्तीने आणि कोणताही वाद न उद्भवता पार पडले, परंतु व्यावसायिक पुरुषांमध्ये बऱ्याच सामन्यांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. पांचगणीतील स्थानिक सामन्यांतही पंचांच्या निर्णयाचा आदर केला जातो. या दिग्गज खेळाडूंकडून आणि संघांकडून आम्हाला चांगला खेळ आणि खेळभावना पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आमची निराशा झाली, असे मत राजपुरे यांनी व्यक्त केले.