सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषक एकदिवसीय स्पर्धेत बुधवारी मुंबईच्या यशस्वी जैस्वाल याने ऐतिहासिक कामगिरी केली. यशस्वीने दमदार द्विशतक झळकावत झारखंडविरुद्ध मुंबईला ३ बाद ३५८ धावांचा डोंगर उभा करून दिला. यशस्वी आणि आदित्य तरे यांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. त्यात तरेने १०२ चेंडूत ६ चौकार व १ षटकार लगावत ७८ धावा ठोकल्या. सिद्धेश लाड (३२) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ३१) यांनीही फटकेबाज खेळी केली. पण यशस्वीने मात्र प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडलेय. त्याने १५४ चेंडूंत १७ चौकार व १२ षटकार ठोकत २०३ धावा कुटल्या.

यशस्वीने त्याच्या या द्विशतकी खेळीच्या जोरावर विविध विक्रमांना गवसणी घातली. मुंबईकडून खेळताना त्याने २१२ धावा केल्या. अ श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूने झळकावलेले हे नववे द्विशतक ठरले. तसेच तो द्विशतक ठोकणारा सातवा फलंदाज ठरला. याशिवाय १७ वर्षांचा यशस्वी अ श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम यशस्वीने केला.

तसेच यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेतील हे दुसरे द्विशतक ठरले. केरळच्या संजू सॅमसनने काही दिवसांपूर्वीच गोवा संघाविरुद्ध २१२ धावा केल्या होत्या. अ श्रेणी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक ३ द्विशतके झळकावली आहेत. तर विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, सचिन तेंडुलकर, कर्ण वीर आणि संजू सॅमसन यांनी १-१ द्विशतक ठोकली आहेत. त्यांच्या पंगतीत त्याने स्थान मिळवले.