सर्फराजच्या अर्धशतकानंतरही ८ बाद २४९ अशी स्थिती

सौराष्ट्रचा डावखुरा फिरकीपटू धर्मेद्रसिंह जडेजा याच्या प्रभावी माऱ्यासमोर मुंबईची फलंदाजी गडगडली. बहरात आलेल्या सर्फराज खानच्या अर्धशतकानंतरही मुंबईने ‘करो या मरो’ अशा स्थितीत असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील ब गटातील या सामन्यात पहिल्या दिवसअखेर ८ बाद २४९ धावसंख्या उभारली आहे.

जय बिश्ता आणि भूपेन ललवानी यांनी चांगली सलामी दिली. मात्र त्यांना आपल्या खेळीचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नाही. हे दोघेही माघारी परतल्यानंतर मुंबईच्या आघाडीच्या फळीने पुन्हा एकदा निराशा केली. बिश्ता (४३), ललवानी (२५), सिद्धेश लाड (१३) आणि सूर्यकुमार यादव (०) पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मुंबईची अवस्था बिनबाद ६२ वरून ४ बाद ८८ अशी झाली होती. सूर्यकुमार पहिल्याच चेंडूवर पायचीत होऊन माघारी परतल्याने मुंबईला मोठा धक्का बसला.

त्यानंतर सर्फराज आणि शाम्स मुलानी यांनी मुंबईच्या डावाला पुन्हा एकदा उभारी दिली. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी १०९ धावांची भर घातली. गेल्या दोन सामन्यांत एक त्रिशतक आणि एक द्विशतक साकारणाऱ्या सर्फराजकडून दमदार खेळी अपेक्षित असताना कमलेश मकवानाने त्रिफळाचीत करत मोठा अडसर दूर केला. सर्फराजची खेळी ९ चौकार आणि २ षटकारांसह ७८ धावांवर संपुष्टात आली. सर्फराजने गेल्या तीन सामन्यांत आपल्या नावावर ६०५ धावा नोंदवल्या आहेत.

कर्णधार आदित्य तरे (१०) स्वस्तात बाद झाल्यानंतर मुलानी याने एका बाजूने चिवट झुंज दिली. अखेरीस विनायक भोईर (२१) आणि शशांक अत्तार्डे (०) यांना एकापाठोपाठ माघारी पाठवत सौराष्ट्रने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवले. मुलानी ६ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावांवर खेळत आहे. सौराष्ट्रकडून जडेजाने आतापर्यंत पाच बळी मिळवले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मुलानी मुंबईचा डाव कितपत लांबवतो, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.

महाराष्ट्राने वर्चस्वाची संधी गमावली

पुणे : दमदार सलामीनंतर एक वेळ ओदिशाची ५ बाद ९६ धावा अशी अवस्था केली असताना महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी पूर्ण वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली. त्यामुळे रणजी करंडकातील सामन्यात ओदिशाने पहिल्या डावात ५ बाद २२० धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसअखेर शंतनू मिश्रा ८४, तर राजेश धुपर ६७ धावांवर खेळत आहेत. शंतनू आणि अनुराग सारंगी यांनी ६२ धावांची सलामी दिल्यानंतर आशय पालकरच्या (२/४६) भेदक वेगवान माऱ्यापुढे ओदिशाची घसरगुंडी उडाली. सलामीवीर शंतनूने सातव्या क्रमांकावरील राजेशच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १२४ धावांची अभेद्य भागीदारी रचल्याने ओदिशाला पुनरागमन करता आले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ८९.१ षटकांत ८ बाद २४९ (सर्फराज खान ७८, शाम्स मुलानी खेळत आहे ५९, जय बिश्ता ४३; धर्मेद्रसिंह जडेजा ५/९०, प्रेरक मंकड २/३०) वि. सौराष्ट्र.