मुंबईचा आसामवर ८३ धावांनी शानदार विजय; तरेची झंझावाती खेळी

उत्तेजक पदार्थाचे सेवेन केल्याप्रकरणी निलंबनाची शिक्षा झालेल्या पृथ्वी शॉ याने रविवारी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये झोकात पुनरागमन केले. पृथ्वीने साकारलेल्या ६३ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत आसामवर ८३ धावांनी शानदार विजय मिळवला.

उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेली आठ महिन्यांची बंदीची शिक्षा संपल्यानंतरच्या पहिल्याच सामन्यात पृथ्वीने वानखेडे स्टेडियमवरील चाहत्यांना निराश केले नाही. जय बिश्ताऐवजी मुंबईच्या संघात परतलेल्या २० वर्षीय पृथ्वीने ३९ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. त्याने आदित्य तरेच्या (४८ चेंडूंत १२ चौकार आणि १ षटकार) साथीने १३.४ षटकांत १३८ धावांची दमदार सलामी नोंदवली. त्यामुळेच मुंबईने २० षटकांत ५ बाद २०६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

त्यानंतर, मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेच्या (३ धावांत २ बळी) नेतृत्वाखाली मुंबईने आसामला २० षटकांत ८ बाद १२३ धावांवर रोखून आरामात विजय साजरा केला. आसामकडून रियान परागने ३३ चेंडूंत ३८ धावा केल्या. मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि शाम्स मुलांनी यांनीसुद्धा प्रत्येकी दोन बळी घेतले.

पृथ्वीचा मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यासाठी आणि गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अव्वल साखळी स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. रविवारच्या पृथ्वीच्या खेळीत ३२ धावांवर असताना त्याला लाँगऑफला जीवदान मिळाले. मग त्याने आत्मविश्वासाने खेळ केला.  उत्तरार्धात सिद्धेश लाडने १४ चेंडूंत वेगवान ३२ धावा केल्या. आसामच्या परागने ३० धावांत ३ बळी घेतले.

मुंबई ‘ड’ गटात अव्वल

मुंबईने ७ सामन्यांत ६ विजयांसह २४ गुण मिळवत ‘ड’ गटातील अग्रस्थान राखले आहे. त्यामुळे अव्वल साखळीतील स्थान मुंबईचे निश्चित झाले आहे.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : २० षटकांत ५ बाद २०६ (आदित्य तरे ८२, पृथ्वी शॉ ६३; रियान पराग ३/३०) विजयी वि. आसाम : २० षटकांत ८ बाद १२३ (रियान पराग ३८; शिवम दुबे २/३)

गुण : मुंबई ४, आसाम ०

संघाला विजय मिळवून देणाऱ्या अधिकाधिक धावा काढण्याकडे मी लक्ष केंद्रित करणार आहे. भारतीय संघात पुनरागमन, हेच माझे ध्येय आहे. आता निवड समिती त्याचा कसा विचार करते, ते महत्त्वाचे असेल. बंदीचा काळ हा आयुष्यातील सर्वात निराशाजनक असा होता. या कालखंडातील प्रत्येक दिवस हा आव्हानात्मक होता. सुरुवातीचे २०-२५ दिवस तर हे कसे घडले, हेच उमगण्यात गेले. मग बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या साहाय्यामुळे पुनरागमन करू शकलो.

– पृथ्वी शॉ