News Flash

मुंबई जोशात!

चेन्नईवर दिमाखात विजयासह उपांत्य फेरीत

ख्रस्तिआन व्हॅडकोझने गोल साकारल्यावर मुंबई एफसीने जल्लोष साजरा केला.

चेन्नईवर दिमाखात विजयासह उपांत्य फेरीत; डेफेडिरिको, व्हॅडकोझ गोलचे मानकरी

चलनकल्लोळातही मोठय़ा प्रमाणावर जमलेल्या युवा मुंबईकर फुटबॉल चाहत्यांच्या साक्षीने मुंबई सिटी एफसीने घरच्या मैदानावर इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयन एफसीविरुद्ध दिमाखात २-० असा विजय साजरा केला. चाहत्यांच्या या दमदार प्रतिसादाच्या बळावर मुंबई सिटी एफसीने विजयासह उपांत्य फेरीत वाटचाल केली.

मुंबई सिटी एफसीची जर्सी आणि झेंडे घेऊन दर्दी फुटबॉल चाहत्यांनी मुंबई फुटबॉल एरिना अर्थात शहाजीराजे क्रीडा संकुलानजीक दोन तास आधीच गर्दी केली होती. या विजयासह मुंबईच्या संघाने १३ सामन्यांमध्ये २२ गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे पराभवांची मालिका खंडित करू न शकल्याने चेन्नईचे १२ सामन्यांत १४ गुण झाले आहेत. चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

तिसऱ्याच मिनिटाला मुंबईचा कर्णधार दिएगो फोरलानला फ्री-किकची संधी मिळाली. मात्र त्याला गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. चेन्नईच्या खेळाडूला पाडण्याचा प्रयत्न केल्याने मुंबईचा बचावपटू गेरसन व्हिएइराला पंचांनी पिवळे कार्ड दाखवले. नवव्या मिनिटाला सुनील छेत्रीने गोलवर ताबा मिळवत आगेकूच केली. मात्र पंचांनी आधीच ऑफसाइडचा निर्णय दिला असल्याने त्याने केलेला गोल अवैैध ठरला. दिएगो फोरलानच्या साहाय्याच्या आधारे सुनीलने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थेट चेन्नईच्या गोलरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. चेंडूवर नियंत्रण मिळवताना चेन्नईचा झकीर मुंडमपरा आणि मुंबईचा ओटॅलिको ब्रिटो अल्वेस एकमेकांवर आदळले. दोघांच्याही नाकावर मैदानातच तात्काळ उपचार करण्यात आले.

मग फोरलानने लगावलेला चेंडू चेन्नईच्या मेहराजुद्दीन हुडाने हेडरने टोलवत मैदानाबाहेर भिरकावत मुंबईचा गोल होऊ दिला नाही. पुढच्याच मिनिटाला सुनीलने डाव्या बाजूने जोरदार आक्रमण केले, मात्र चेन्नईच्या बचावपटूने हा प्रयत्न थोपवला. ३२व्या मिनिटाला सुनीलने शिताफीने चेंडूला तटवत मॅटिअस डेफेडिरिकोकडे सोपवला. चपळतेचा उत्कृष्ट नमुना सादर करत त्याने डाव्या बाजूला झेपावणाऱ्या चेन्नईच्या गोलरक्षकाला चकवत भन्नाट गोल केला. या हंगामातला हा शंभरावा गोल ठरला. पुढच्या मिनिटाला चेन्नईच्या जॉन अर्ने रिइसने फ्री किकद्वारे गोल करण्याची संधी वाया घालवली. फोरलानने केलेला गोलचा प्रयत्न चेन्नईच्या गोलरक्षकाने रोखला.

विश्रांतीनंतर नव्या ऊर्जेसह खेळणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण केले. ६०व्या मिनिटाला फोरलानने चेंडू कुशलपणे ख्रिस्तिआन व्हॅडकोझकडे सोपवला. सुरुवातीला छातीवर चेंडूला झेलत व्हॅडकोझने चेन्नईचे बचावपटू व गोलरक्षकाला भेदत अफलातून गोल केला. ७८व्या व ७९व्या मिनिटाला सुनीलने केलेले गोलप्रयत्न गोलपोस्टच्या वरून गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:59 am

Web Title: mumbai beat chennai in isl 2016
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाची भारतावर मात
2 इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात पार्थिव पटेलची वर्णी
3 कर्जाकिनचा तडाखा!
Just Now!
X