मुंबईचा झारखंडवर ३९ धावांनी विजय; धवलचे पाच बळी

बंगळूरु : मुंबईचा उदयोन्मुख किशोरवयीन क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने (२०३) बुधवारी विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत द्विशतकी नजराणा पेश केला. त्याने साकारलेल्या धडाकेबाज खेळीला धवल कुलकर्णीच्या पाच बळींची साथ लाभल्यामुळे मुंबईने झारखंडवर ३९ धावांनी विजय मिळवला.

आलूर येथील केएससीए मैदानावर झालेल्या एलिट ‘अ’ गटातील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५० षटकांत ३ बाद ३५८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात विराट सिंगच्या शतकानंतरही झारखंडचा डाव ४६.४ षटकांत ३१९ धावांवर संपुष्टात आला. गतविजेत्या मुंबईचा हा सात सामन्यांतून चौथा विजय ठरला.

कारकीर्दीत पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या १७ वर्षीय यशस्वीने तब्बल १७ चौकार आणि १२ षटकारांसह १५४ चेंडूंत २०३ धावा फटकावल्या. प्रथम श्रेणीमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारा तो युवा खेळाडू ठरला आहे. त्याने आदित्य तरे (७८) याच्या साथीने २०० धावांची सलामीची भागीदारी केली. त्याशिवाय सिद्धेश लाड (३२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद ३१) यांनीही उपयुक्त योगदान दिल्यामुळे मुंबईने साडेतीनशे धावांचा टप्पा गाठला.

झारखंडतर्फे विराट आणि अनुकुल रॉय (४६) यांनी कडवी झुंज दिली. परंतु त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. सिद्धेशने दोन बळी मिळवून धवलला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : ५० षटकांत ३ बाद ३५८ (यशस्वी जैस्वाल २०३, आदित्य तरे ७८; विवेकानंद विहारी २/३२) विजयी वि. झारखंड : ४६.४ षटकांत सर्व बाद ३१९ (विराट सिंग १००, सौरभ तिवारी ७७; धवल कुलकर्णी ५/३७)

द्विशतक साकारल्याचा आनंद विजयामुळे द्विगुणित झाला. परंतु ही फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या सामन्यांमध्ये अशाच प्रकारे दमदार कामगिरी करून संघाच्या विजयात अधिकाधिक योगदान द्यायचे आहे.

– यशस्वी जैस्वाल, मुंबईचा क्रिकेटपटू

 यशस्वीचे हे या हंगामातील एकूण तिसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने केरळ आणि गोव्याविरुद्ध अनुक्रमे ११३ आणि १२२ धावांची खेळी साकारली होती.

यंदाच्या हंगामातील हे दुसरे द्विशतक ठरले. याआधी केरळच्या संजू सॅमसनने गोव्याविरुद्ध २१२ धावा केल्या होत्या.