बेंगळूरु : यशस्वी जैस्वालच्या दमदार शतकी खेळीमुळे मुंबईने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत केरळचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयानंतरही मुंबईची अ गटात सहाव्या स्थानी घसरण झाल्यामुळे बाद फेरीच्या आशा धुसर झाल्या आहेत.

धवल कुलकर्णी आणि शार्दूल ठाकूर यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरळला ४८.४ षटकांत १९९ धावांवर रोखले. कर्णधार रॉबिन उथप्पाने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. मुंबईकडून धवल आणि शार्दूलने प्रत्येकी तीन बळी मिळवले.

हे आव्हान पेलताना यशस्वी जैस्वाल आणि आदित्य तरे यांनी १९५ धावांची भागीदारी रचत विजयश्री खेचून आणली. जैस्वालने १३२ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांसह १२२ धावांची खेळी केली. तरेने ५ चौकार आणि १ षटकारासह ६७ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. पाच धावांची आवश्यकता असताना दोघेही लागोपाठ माघारी परतल्यानंतर मुंबईने ३८.२ षटकांत हे लक्ष्य पार केले.