वृत्तसंस्था, इंदूर

वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्रचा आठ धावांनी पराभव करून सय्यद  मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या क-गटात पाचव्या विजयाची नोंद केली आणि २० गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान टिकवले आहे.

सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार अजिंक्य रहाणेने (११) पुन्हा निराशा केली. परंतु सलामीवीर पृथ्वी शॉने १७ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह वेगाने ३६ धावा केल्या. मग श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव (२९) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ४८ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. श्रेयसने एक चौकार आणि दोन षटकारांसह ३६ धावा काढल्या. त्यानंतर आकाश पारकर (२०) वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे मुंबईचा डाव १४७ धावांत आटोपला.

त्यानंतर, सौराष्ट्रच्या डावात चेतेश्वर पुजारा (१) अपयशी ठरला. परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रॉबिन उथप्पाने ४१ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ५७ धावांची खेळी साकारली. याशिवाय अर्पित वासवडाने ३६ धावा केल्या. या व्यतिरिक्त सौराष्ट्रचे अन्य फलंदाज फार काळ मैदानावर टिकाव धरू शकले नाहीत. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने ३० धावांत तीन बळी घेण्याची किमया साधली. त्याला धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेत अप्रतिम साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : २० षटकांत सर्व बाद १४७ (पृथ्वी शॉ ३६, श्रेयस अय्यर ३६; प्रेरक मंकड ३/२७) विजयी वि. सौराष्ट्र : १९.५ षटकांत सर्व बाद १३९ (रॉबिन उथप्पा ५७, अर्पित वासवडा ३६; शार्दूल ठाकूर ३/३०)