मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये बलाढय़ समजल्या जाणाऱ्या मुंबई संघाचे मुश्ताक अली ट्वेन्टी-२० करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान सलग तिसऱ्या पराभवानंतर संपुष्टात आले. एलिट इ गटातील साखळी सामन्यात मुंबईला शुक्रवारी हरयाणाकडून आठ गडी राखून पराभव पत्करावा लागला.

मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑफ स्पिनर जयंत यादव आणि मध्यमगती गोलंदाज अरुण चापराना यांच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला. मुंबईकडून यशस्वी जैस्वाल याने ३५ धावांची खेळी केली. कर्णधार आदित्य तरे (८) अपयशी ठरला. तसेच सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड आणि शिवम दुबे यांना खातेही खोलता आले नाही. ५ बाद ५६ अशा परिस्थितीतून सर्फराझ खान (३०) आणि अथर्व अंकोलेकर (३७) यांनी मुंबईचा डाव सावरला. अर्जुन तेंडुलकरने मुंबई संघातून पदार्पण केले, पण त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही.

हरयाणाची स्थिती २ बाद २७ अशी असतानाही हिमांशू राणाच्या नाबाद ७५ धावांच्या खेळीमुळे त्यांनी सहज विजय मिळवला. हिमांशूने शिवम चौहानच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ११७ धावांची भागीदारी साकारत १४ चेंडू राखून विजय मिळवला. शिवमने नाबाद ४३ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : १९.३ षटकांत सर्व बाद १४३ (अथर्व अंकोलेकर ३७, यशस्वी जैस्वाल ३५; जयंत यादव ४/२२) पराभूत वि. हरयाणा: १७.४ षटकांत २ बाद १४४ (हिमांशू राणा नाबाद ७५, शिवम चौहान नाबाद ४३; अर्जुन तेंडुलकर १/३४)