आक्रमणात ढिसाळपणा.. धसमुसळा बचाव.. निकोलस अनेल्काची उपस्थिती.. पहिल्या सत्रात अनेक गोल वाचवूनही अखेरच्या क्षणी गोलरक्षक सुब्रतो पॉलने केलेली खराब कामगिरी.. यामुळे मुंबई सिटी एफसीने रविवारी घरच्या मैदानावर चाहत्यांची सपेशल निराशा केली. गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्याने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर तब्बल २४ हजार चाहत्यांच्या साक्षीने मुंबईला चेन्नईन एफसीकडून सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरच्या २० मिनिटांत सुरेख खेळाचे प्रदर्शन करत चेन्नईने मुंबईवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यातील पराभवामुळे मुंबईची गुणतालिकेत १२ गुणांसह सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. चेन्नईने १९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. ब्रुनो पेलिसारीने डाव्या पायाने चेंडू हळूच गोलजाळ्यात सरकवत चेन्नईचे खाते खोलले. १० मिनिटानंतर धनचंद्र सिंगने फ्री-किकवर लगावलेला गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. चेन्नईचा विजय दृष्टिक्षेपात असताना ख्रिस्तियन गोंझालेझने तिसरा गोल करून चेन्नईच्या विजयावर मोहोर उमटवली.