ज्युनिअर क्रिकेटकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होत आहेत. त्याचे परिणाम हे अशा प्रकारे दिसून येत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत मुंबई क्रिकेटमध्ये मतदानाचे राजकारण सुरू आहे. मुंबईचे क्रिकेट हे वेस्ट इंडिजच्या मार्गाने जात आहे, अशा शब्दांत मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबई संघाच्या कामगिरीचे विश्लेषण केले. गतवर्षी मुंबईचा संघ उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राकडून हरल्यानंतर कुलकर्णी यांचे प्रशिक्षकपद मुंबई क्रिकेट असोसिएशनने काढून घेतले होते.
‘‘पूर्वी बाळ म्हाडदळकर गट किंवा प्रवीण बर्वे गट हे निवडणुकीच्या वेळी वाद घालायचे, परंतु मुंबई जिंकली की एकत्रित हा आनंद साजरा करायचे. कारण क्रिकेट हे एकच ध्येय त्यांनी जोपासले होते. त्या वेळी क्रिकेट विकास समिती (क्रिकेट इम्प्रूव्हमेंट कमिटी) होती. माधवराव आपटे, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर अशी क्रिकेटची जाण असलेली मंडळी या समितीत होती. व्यवस्थापन समितीमधील किती जण क्रिकेट खेळले आहेत आणि खेळलेल्या किती मंडळींचे ऐकले जाते, या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत,’’ अशी टीका कुलकर्णी यांनी केली. मुंबई क्रिकेटच्या सद्य:स्थितीबाबत कुलकर्णी यांच्याशी केलेली बातचीत-

दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीचा मुंबईच्या कामगिरीला फटका बसला का?
सचिन तेंडुलकर किंवा दिग्गज खेळाडू संघात नव्हते, म्हणून आपण जिंकू शकलो नाही, हे मला पटत नाही. सचिन, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर नसताना मुंबईने अनेकदा रणजी करंडक जिंकण्याची किमया साधली आहे. त्यामुळे कोणत्याही मोठय़ा खेळाडूच्या नसण्याने मुंबईच्या कामगिरीत कधीच फरक पडला नाही. मुंबईने आजमितीपर्यंत ४० वेळा जेतेपद जिंकून नेमके हेच सिद्ध केले आहे. मागील काही वर्षांचा जरी आढावा घेतला तरी सचिन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आदींचे चांगले योगदान असले तरी अन्य खेळाडूंच्या कामगिरीचे महत्त्वसुद्धा नाकारता येत नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारे उदयोन्मुख खेळाडू संधीची वाट पाहायचे आणि कामगिरी करण्याची हीच प्रेरणा मग मैदानावर दिसून यायची.

पहिल्याच सामन्यात संघाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. मुंबई क्रिकेटचे नेमके काय चुकले?
ज्युनिअर क्रिकेट हा कोणत्याही असोसिएशनचा आत्मा असतो. ज्युनिअर क्रिकेटला आपण हृदय म्हटले तर प्रथम श्रेणी क्रिकेट हा चेहरा असतो. तुमचे हृदय खंबीर असेल, तरच चेहरा अधिक चांगला दिसतो. ज्युनिअर क्रिकेट सध्या काय स्थितीत आहे, हे पाहण्याची गरज आहे. पुढील तीन वर्षांचा विचार करून दुसरी फळी बांधावी लागते. मुंबईच्या सध्याच्या संघातील अनेक खेळाडू युवा आहेत. त्यांचे ज्युनिअर दर्जाचे क्रिकेट योग्य पद्धतीने घडले असते, तर मुंबईचा संघ असा धडपडताना दिसला नसता.

ज्युनिअर क्रिकेटकडे अन्य ठिकाणी कसे पाहिले जाते?
अ‍ॅलन बोर्डर, अ‍ॅण्डी फ्लॉवर, ग्रॅहम गूच, रॉडनी मार्श या क्रिकेटमधील दिग्गजांनी निवृत्तीनंतर ज्युनिअर क्रिकेटला खूप मोठे योगदान दिले. क्रिकेटने मला खूप दिले, परंतु आता मला क्रिकेटला काही तरी परत द्यायचे आहे, अशी बोर्डरची धारणा होती. त्याच प्रेरणेने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर पहिली चार-पाच वष्रे त्याने फक्त ज्युनिअर क्रिकेटच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले. मार्शनेसुद्धा बरीच वष्रे ज्युनिअर क्रिकेटसाठी वेचली. मोठय़ा क्रिकेटपटूंनी ज्युनिअर क्रिकेटला महत्त्व दिल्यामुळे त्यांचे वरिष्ठ दर्जाचे क्रिकेट चांगले झाले. भारतात अशी उदाहरणे मोजकीच सापडतात. मुंबईत फक्त दिलीप वेंगसरकर ज्युनिअर क्रिकेटसाठी धडपडताना दिसत आहे. भारतामध्ये फक्त वरिष्ठ संघालाच मान दिला जातो, ज्युनिअर क्रिकेटची हेळसांड होत आहे.

प्रशिक्षकाकडे मुंबईचे क्रिकेट कशा पद्धतीने पाहते?
त्रिपुराच्या प्रशिक्षकाला पाच वर्षांपूर्वी ३५ लाख मानधन होते, त्या वेळी प्रवीण अमरे यांना पाच लाख दिले जात होते, ही वस्तुस्थिती आहे. अमरे यांना आता २० लाख रुपये दिले जात असतील, तर त्रिपुराच्या प्रशिक्षकाचे मानधन किती असेल? विजेतेपदाशिवाय आम्हाला अन्य काहीच नको, हे एकीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशन ब्रीदवाक्य जपते. त्यामुळे जेतेपद मिळाले नाही, तर प्रशिक्षक अपयशी असा शिक्का मारला जातो. परंतु अपेक्षांचे ओझे बाळगणाऱ्या प्रशिक्षकाला मानधन देताना मात्र हात आखडता घेतला जातो. अमरे यांनी पाच वर्षांत तीन वेळा रणजी विजेतेपद मिळवून दिल्या होत्या. वरिष्ठ प्रशिक्षकाला हे मानधन मिळत असेल, तर ज्युनिअर क्रिकेटला काय मिळत असेल? त्यामुळे कोणता प्रशिक्षक आनंदाने मुंबई क्रिकेटची ही मानाची जबाबदारी सांभाळायला तयार होईल?