स्थानिक क्रिकेटमधील सर्वात बहुचर्चित अशा मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निर्णयावर सोमवारी शिक्कामोर्तब होणार आहे. मुंबईचा माजी कर्णधार अजित आगरकर, १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य बिशन सिंग बेदी, माजी प्रशिक्षक प्रवीण अमरे, माजी वेगवान गोलंदाज पारस म्हांब्रे, संदीप दहाड आणि साईराज बहुतुले यापैकी कुणाची या पदी निवड होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्रशिक्षक म्हणून पदभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच प्रयत्नांत सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईला ४०वे रणजी जेतेपद मिळवून दिले होते. मात्र दुसऱ्या हंगामात प्रमुख खेळाडूंची राष्ट्रीय संघात निवड, दुखापती, कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे मुंबईला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. एकदिवसीय तसेच ट्वेन्टी-२० स्पर्धेतही मुंबईची कामगिरी ढासळतच राहिली. संघाला नव्या विचारांचा, नव्या धोरणांचा प्रशिक्षक हवा, यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने कुलकर्णी यांना डच्चू दिला होता.
तात्पुरते प्रशिक्षक म्हणून लालचंद राजपूत हे काम पाहत आहेत. मुंबई क्रिकेटशी निगडीत अनेक खेळाडू, प्रशिक्षक असे एकूण सहा जणांनी प्रशिक्षकपदासाठी सादरणीकरण केले असून, सोमवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनी मुंबई संघाच्या निवड समितीचे प्रमुखपद स्वीकारले आहे. प्रशिक्षक आणि निवड समितीचा बदललेला चेहरा मुंबईला विजयपथावर आणू शकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.