रणजी सामन्यादरम्यान सहकारी व राजस्थान रॉयल्सचा खेळाडू प्रवीण तांबेला आयपीएलमधील सामना निश्चितीचा प्रस्ताव दिल्याप्रकरणी बीसीसीआयकडून निलंबित करण्यात आलेला मुंबईच्या रणजी संघातील क्रिकेटपटू हिकेन शहा याने निलंबनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर न्यायालयाने बीसीसीआयला न्यायालयाने उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
शहा हा मुंबईच्या रणजी संघातील फलंदाज आहे. तांबे याने त्याच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी शहा हा दोषी आढळून आल्यानंतर बीसीसीआयने १३ जुलै रोजी त्याला निलंबित केले होते. बीसीसीआयच्या दाव्यानुसार राजस्थान रॉयल्सकडून याबाबत बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना माहिती देण्यात आल्यावर बीसीसीआयच्या लाच प्रतिबंधक विभागाने प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशी आयुक्तांनी शहाला त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी दोषी ठरवले. त्यानंतर बीसीसीआयने त्याला निलंबित केले.
या निर्णयाला शहा याने सोमवारी अ‍ॅड्. सोम सिन्हा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. निलंबनाचा निर्णय सुनावण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात आली नाही, असा दावा त्याने याचिकेत केला आहे. तसेच त्याचआधारे निलंबनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने बीसीसीआयला शहा याच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश देत सुनावणी १२ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.