ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी सुरूवातीला काहीशी डगमगली. पण तळाच्या दोन फलंदाजांनी दमदार खेळ करत संघावरील दबाव कमी केला. शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा (४४), चेतेश्वर पुजारा (२५), अजिंक्य रहाणे (३७), मयंक अग्रवाल (३८) आणि ऋषभ पंत (२३) हे फलंदाजही खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर बाद झाले. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली.
शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. ११५ चेंडूत त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावत अर्धशतक केले. तसेच सुंदरनेदेखील १४४ चेंडूत ६२ धावा केल्या. भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने आपल्या हटके अंदाजात या दोघांचं कौतुक केलं. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात सुरू असलेल्या सामन्याबाबत त्याने ट्विट केले, “गाबा दा ढाबा. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासाठी आजची फलंदाजी म्हणजे ढाब्यावर जाऊन छान जेवणावर ताव मारण्यासारखं होतं. दोघांनी अप्रतिम खेळ करून दाखवला. या दोघांच्या प्रयत्नांमुळेच ऑस्ट्रेलियाला केवळ ३३ धावांची आघाडी घेता आली. एकेकाळी ती आघाडी १३३ धावांची होते की काय असं वाटत होतं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा एकत्रित मिळून हजारांहून जास्त सामन्यांचा अनुभव आहे. त्यांच्याविरूद्ध असा खेळ करणं खूपच मोठी गोष्ट आहे”, असं सेहवाग म्हणाला.
Gabba the Dhaba for these two guys.
Brilliant from Sundar and Thakur. pic.twitter.com/NouAYYFyN4
— Virender Sehwag (@virendersehwag) January 17, 2021
Adelaide 2003 : India conceded a lead of 33. Today in Brisbane India concede 33 , when at one stage it looked like they may end up conceding 133.
Great effort considering that Australia’s 4 bowlers had more than 1000 Test wickets to India’s 5 bowlers having 11. Shandar Zabardast— Virender Sehwag (@virendersehwag) January 17, 2021
दरम्यान, या दोघांच्या खेळीच्या जोरावर एकेकाळी ६ बाद १८६ अशी अवस्था असणाऱ्या भारतीय संघाने ३३६ धावांपर्यंत मजल मारली. सुंदर-शार्दुल या दोघांनी १२३ धावांची भागीदारी रचली. अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या नवख्या जोडीने शांत आणि संयमी फलंदाजी केली. दोघांनीही आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली. ब्रिस्बेनच्या मैदानावर सातव्या विकेटसाठी ही भारताची सर्वात मोठी भागीदारी ठरली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2021 2:38 pm