IPL 2020 संपल्यानंतर आता बीग बॅश लीगच्या दहाव्या हंगामाचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. १० डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत अधिक रंगत आणण्यासाठी स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धेत ३ नवे नियम आणले आहेत. मात्र हे नियम अनेक दिग्गज क्रिकेटर आणि समीक्षकांना पटलेले नाहीत. समालोचक हर्षा भोगलेंपासून ते मुंबईकर माजी क्रिकेटपटू वासिम जाफर साऱ्यांनी या नियमांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वासिम जाफरने तर एक भन्नाट मीम पोस्ट करत बीग बॅश लीगच्या नव्या नियमांची ट्विटरवरुन खिल्ली उडवली.

बीग बॅश लीगच्या नव्या नियमांचं काही खेळाडूंनी समर्थन केलं आहे, तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला. वासिम जाफरने नव्या नियमांवर आक्षेप नोंदवला. त्याने याबाबत काही कमेंट करणं टाळलं. त्याने केवळ एक भन्नाट मीम पोस्ट करत BBLला लक्ष्य केलं. जाफरने बीग बॅश लीगच्या नव्या नियमांबाबतच्या ट्विटवर कमेंट करत ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातील एका सीनचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्या स्क्रीनशॉटमध्ये ‘ये क्या बवासीर बना दिए हो?’ असं लिहिलं आहे. हे ट्विट आता चांगलंच व्हायरल होत आहे.

नक्की काय आहेत नियम?

बिग बॅश लीगमधील रंजकता वाढवण्यासाठी काही नवे नियम करण्यात आले आहेत. यात पॉवरप्लेच्या ६ षटकांचं विभाजन करण्यात आलं आहे. पहिल्या ४ षटकात सक्तीचा पॉवरप्ले असणार आहे तर उर्वरित २ षटकांचा पॉवरप्ले ११व्या षटकानंतर केव्हाही फलंदाजांना सोयीनुसार घेता येणार आहे. याशिवाय गुणदान प्रक्रियेतही एक बदल करण्यात आला असून दुसऱ्याच्या डावाच्या १०व्या षटकानंतर जो संघ तुलनेने भक्कम स्थितीत असेल त्याला एक बोनस गुण दिला जाणार आहे. तसेच, पहिला डाव संपल्यावर आपल्या Playing XIमध्ये बदल करण्याची संधीदेखील अटी-शर्तींसह संघांना देण्यात आली आहे.