05 March 2021

News Flash

एमडीएफएचा भार झेव्हियर्स मैदानावरच

मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. मात्र याच मुंबईत एकेकाळी फुटबॉलची लोकप्रियता ही क्रिकेटपेक्षा अधिक होती.

| July 31, 2015 01:03 am

spt02मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. मात्र याच मुंबईत एकेकाळी फुटबॉलची लोकप्रियता ही क्रिकेटपेक्षा अधिक होती. उत्तर ते दक्षिण मुंबईच्या कोणत्याही टोकाला फुटबॉलचा सामना असो, स्टेडियमवर हाऊसफुल्ल उपस्थिती असायची. मात्र काळ उलटला आणि समीकरणही बदलले. काळानुसार मोकळ्या मैदानांची संख्या कमी झाली आणि त्याचा सर्वाधिक फटका फुटबॉलला बसला. आता परिस्थिती अशी आहे की, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनला (एमडीएफए) परेल येथील सेंट झेव्हियर्स मैदानावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे स्पर्धाचा ताण या एकाच मैदानाला सहन करावा लागत आहे. कुपरेज किंवा संलग्न क्लबच्या मैदानावर एमडीएफएचा कारभार सुरू असला, तरीही मैदान प्रत्येक वेळी उपलब्ध असतेच असे नाही.
१९९०च्या दशकात मुंबईत फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी गर्दीचा उच्चांक व्हायचा. स्टेडियमवर जिथे जागा मिळेल, तिथे प्रेक्षक उभे राहून सामना पाहायचे. मात्र, आता आय-लीगच्या सामन्यांनाही हाताची बोटं मोजण्याइतकीच गर्दी होते. या दयनीय परिस्थितीला स्थानिक संघटना जबाबदार असल्याचा आरोप काही माजी खेळाडूंकडून केला जात आहे. ९०च्या दशकात परेलच्या मैदानात खूप उपयुक्त होते. पावसाळ्यातही एखादा सामना सहज खेळला जाऊ शकत होता, परंतु आता त्या मैदानाची परिस्थिती पाहावत नसल्याची खंत एका वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केली.
वर्षांनुवष्रे डिव्हिजन-१ पासून ते सुपर डिव्हिजनच्या लढती या मैदानावर खेळवल्या जात असल्याने मैदानाची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळे दुखापतींचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंच्या सुरक्षेबरोबर त्यांच्या खेळातील प्रगतीची जबाबदारी एमडीएफएची असतानाही त्यांच्याकडून काहीच पाऊल उचलले जात नाही. केवळ औपचारिकता म्हणून स्पर्धा पार पाडण्याचा प्रकार होताना दिसतो. काही वेळा मैदानाची अवस्था पाहून केवळ नाणेफेक करून निकाल लावून संघ समाधान मानतात, असे एका जाणकाराने सांगितले.
भाजप नेते आशीष शेलार एमडीएफएच्या कार्याध्यक्षपदी असताना वांद्रे येथे मैदान घेण्याच्या हालचालींना वेग आला होता. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे ते मैदानही हातचे गेले. त्यानंतर कार्याध्यक्षपदी आलेल्या युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रणधुमाळीतून वेळ न मिळाल्याने हा प्रश्न पुन्हा रखडला. त्यामुळे एमडीएफएच्या गलथान कारभाराचा भार आणखी किती वष्रे सेंट झेव्हियर्स मैदानाला उचलावा लागणार, हा प्रश्न उनुत्तरितच आहे.

मुंबईत फुटबॉल मैदान नसल्याची रणबीर कपूरला खंत
इंडियन सुपर लीग स्पध्रेतील मुंबई सिटी एफसी संघाचा मालक आणि बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने मुंबईत फुटबॉलसाठी मैदान नसल्याबाबत खंत व्यक्त केली. मुंबईत अनेक उद्योन्मुख खेळाडू आहेत आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मैदानाची आवश्यकता असल्याचे मत त्याने एका खासगी कार्यक्रमात व्यक्त केले होते. तसेच फुटबॉलसाठी दर्जेदार मैदान नसल्यामुळे त्याच्या संघाला नवी मुंबईत दररोज सरावासाठी जावे लागत असल्याचेही त्याने सांगितले.

एमडीएफएचे कार्याध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे. यंदाच्या मौसमात अंधेरी क्रीडा संकुलावर सामने खेळविण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच चुनाभट्टी येथील के. जे. सोमय्या आयटी महाविद्यालयानेही त्यांचे मैदान सामन्यांसाठी वापरण्याची परवानगी दिलेली आहे. लवकरच वांद्रे संकुलातील म्हाडाच्या जागेवर एमडीएफएचे स्वत:चे मैदान तयार करण्यात येईल.
– उदयन बॅनर्जी, एमडीएफए सचिव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:03 am

Web Title: mumbai district football association has only st xaviers ground for football
Next Stories
1 इंग्लिश फुटबॉल असोसिएशनचा प्लॅटिनींना पाठिंबा
2 अँडरसन तळपला
3 जयपूरची विजयाची बोहनी
Just Now!
X