नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मात्र, त्याच्या या यशात मोलाचा वाटा एका मुंबईकराचाही आहे हे तुम्हाला माहित आहे का? गोल्डन मॅनच्या या मजबूत गोल्डन आर्मसाठी या मुंबईकरानेही कष्ट घेतले आहेत. त्यांचं नाव आहे दिनशॉ परडीवाला.

नीरज आपलं ऑलिम्पिकचं स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न करत होताच. मात्र, २०१९ साली अचानक त्यांच्या कोपराला गंभीर दुखापत झाली. आता त्याला बरं करण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. ही शस्त्रक्रिया केली प्रसिद्ध शल्यचिकित्सक दिनशॉ परडीवाला यांनी. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळेच नीरज आपलं ऑलिम्पिकचं स्वप्न पूर्ण करू शकला.

हेही वाचा – शारीरिक लवचीकता, हाताच्या चपळ गतीमुळे नीरज यशस्वी!

नीरजव्यतिरिक्त दिनशॉ परडीवाला यांनी काही मोठ्या क्रिकेटपटूंवरही उपचार केले आहेत. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर तसंच पी.व्ही.सिंधू, साईना नेहवाल आणि फोगाट बहिणींवरही त्यांनी उपचार केले आहेत. नीरजवर केलेल्या शस्त्रक्रियेबद्दल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना डॉ.परडीवाला म्हणाले की, जर सगळं व्यवस्थित पार पडलं नसतं, शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसती, तर त्याला पुन्हा भालाफेक हा खेळ खेळता येणं अशक्य होतं.

२०१९ मध्ये कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे नीरजला दोहा इथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपलाही मुकावं लागलं होतं. ज्या हाताने भाला फेकला जातो, त्याच हाताला म्हणजे उजव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉ. परडीवाला यांनी ३ मे २०१९ रोजी कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले. डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला प्रचंड वेदना होत होत्या आणि कोपराच्या टिश्यू तुटल्या होत्या. या तुटलेल्या टिश्यूज बाजूला काढण्याची ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तब्बल २ तास चालली. त्यानंतर त्याला ४ महिने पूर्ण विश्रांती घेणं भाग होतं.