* राखण्यात मुंबईची धन्यता
* रणजी करंडक क्रिकेट
निर्णायक विजयाची आशा धरणाऱ्या मुंबईच्या संघाने सौराष्ट्रविरुद्धचा अ गटातील रणजी सामना अनिर्णीत राखण्यात समाधान मानले. सौराष्ट्रला ३०० धावांवर रोखल्यानंतर फॉलो-ऑन देण्याऐवजी मुंबईने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्या डावात ५ बाद ६०६ धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईच्या खात्यावर फक्त तीन गुण जमा झाले, तर सौराष्ट्रला एक गुण मिळाला.
अर्पित वासावादाचे शतक हे मंगळवारच्या दिवसाचे वैशिष्टय़ होते. सोमवारच्या ८ बाद २४८ धावसंख्येत सौराष्ट्रने आणखी ५२ धावांची भर घातली. वासावादाने नाबाद १११ धावा केल्या. जयदेव उनाडकट (२८) याच्यासोबत वासावादाने नवव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. धवल कुलकर्णीने आधी उनाडकटला आणि मग सिद्धार्थ त्रिवेदीला तंबूची वाट दाखवली. कुलकर्णीने ५८ धावांत ४ बळी घेतले.
त्यानंतर मुंबईचा कप्तान अजित आगरकरने सौराष्ट्रवर फॉलो-ऑन लादला नाही आणि फलंदाजी करणे पसंत केले.  दुसऱ्या डावात मुंबईने ४ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारली. वसिम जाफर (७१) आणि रोहित शर्मा (७१) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. खेळ थांबला तेव्हा अंकित चव्हाण (१) आणि इक्बाल अब्दुल्ला (०) मैदानावर होते. मुंबईच्या खात्यावर आता १४ आणि सौराष्ट्रच्या खात्यावर १६ गुण जमा आहेत.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ५ बाद ६०६ (डाव घोषित) आणि ४ बाद १६९ (वसिम जाफर ७१, रोहित शर्मा ७१) विरुद्ध सौराष्ट्र : ३०० (अर्पित वासावादा नाबाद १११, जयदेव शाह ६०; धवल कुलकर्णी ४/५८, जावेद खान २/४३)