इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये (ईपीएल) खेळण्याचे स्वप्न भारतातील प्रत्येक युवा फुटबॉलपटू पाहतो, परंतु सर्वाचे हे स्वप्न साकारत नाही. मात्र, मुंबईकर ध्रुवमिल पांडय़ाला ईपीएलमधील क्रिस्टल पॅलेस संघाच्या अकादमीमध्ये एक वर्ष सराव करण्याची आणि एका मत्रीपूर्ण लढतीत अकादमीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. ‘इंग्लंडमध्ये खेळण्याचे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे,’ अशी प्रतिक्रिया ध्रुवमिलने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
मिलवाल एफसी क्लबविरुद्ध होणाऱ्या लढतीत १५ वर्षीय ध्रुवमिल क्रिस्टल पॅलेस अकादमीचे प्रतिनिधित्वही करणार आहे. इपीएलमधील नावाजलेला क्रिस्टल पॅलेस आणि इंडियन सुपर लीगमधील मुंबई सिटी एफसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्ले फॉर पॅलेस’ या उपक्रमात जवळपास ३५० खेळाडूंमधून ध्रुवमिलची निवड झाली आहे. या उपक्रमाबाबत तो म्हणाला, ‘‘३५० खेळाडूंमध्ये मी वयाने सर्वात लहान होतो. त्यामुळे त्यांच्यामधून निवड होणे, ही बाब अभिमानास्पद आहे.
इतक्या कमी वयात ही संधी मिळणे, हा बहुमानच आहे. पॅलेसचे मार्क ब्राईट आणि इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू रॉबी फॉवलर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. इंग्लंडमध्ये खेळण्याचे स्वप्न नेहमी पाहत आलो आणि त्या स्वप्नपूर्तीचा मार्ग खुला झाला.’’
गोरेगाव येथील गोकुळधाम हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या ध्रुवमिलने या संधीचा फायदा उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. तो म्हणाला, ‘‘तेथे जाऊन त्यांची फुटबॉल शैली शिकण्याचा आणि ती आत्मसात करण्याचा माझा प्रयत्न असेल. कुटुंबाने आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले.’’ १९०५मध्ये स्थापन झालेला दक्षिण लंडनमधील क्लब ध्रुवमिलच्या शिक्षणाचा आणि सरावाचा खर्च उचलणार आहे.
तिसरा भारतीय
भारताचे वरिष्ठ खेळाडू गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू आणि विंगर रोमिओ फर्नाडिस यांनी अनुक्रमे नॉर्वेगिआन क्लब स्टॅबेक आणि ब्राझिलीयन क्लब अ‍ॅटलेटिको पॅरानाइन्से संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परदेशी क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळालेला ध्रुवमिल हा तिसरा भारतीय खेळाडू आहे.