29 October 2020

News Flash

हंगामाच्या अखेरीस सलामीवीरांचा उदय!

माहीमकर हार्दिक-आकर्षित यांची शतके मुंबईसाठी फलदायी

आकर्षित गोमेल व हार्दिक तामोरे

माहीमकर हार्दिक-आकर्षित यांची शतके मुंबईसाठी फलदायी

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : तब्बल ४१ वेळा विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबईचा यंदाचा रणजी हंगाम संपायला आला तरी सलामीचा तिढा कायम होता. कसोटी विशेषज्ज्ञ अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिश्त, भुपेन लालवाणी यांसारखे अनेक पर्याय वापरूनसुद्धा मुंबईला अपेक्षित यश लाभले नाही. परंतु अखेरच्या साखळी सामन्यात हार्दिक तामोरे आणि आकर्षित गोमेल यांच्या रूपाने मुंबईला भविष्यातील उत्तम सलामी जोडी गवसली आहे.

मुंबईच्या २३ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद सांभाळणारा हार्दिक माहीमच्या मच्छीमार कॉलनीत राहतो, तर आकर्षित पोलीस कॉलनीमध्ये वास्तव्यास आहे. त्याशिवाय हे दोघे हॉटेलमध्येही एकाच खोलीमध्ये राहात असल्याने दोघांमधील बंधुप्रेम त्यांच्या वागण्यातूनही निदर्शनास येते. कारकीर्दीतील पहिलाच रणजी सामना खेळणाऱ्या २६ वर्षीय आकर्षितने मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीतील पहिल्या डावात १२२ धावांची खेळी साकारली, तर २२ वर्षीय हार्दिकने दुसऱ्या डावात ११३ धावा काढून मुंबईला सामन्यावरील पकड मजबूत करून दिली.

बोईसर येथून पाच वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झालेल्या हार्दिकने शुक्रवारी शतकानंतर भावना व्यक्त करताना संघसहकाऱ्यांचे आभार मानले. ‘‘मुंबई क्रिकेट संघटनेने माझ्यावर सातत्याने विश्वास दर्शवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. संघसहकाऱ्यांनीसुद्धा मला माझ्यातील क्षमतेची जाणीव करून दिली. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आल्याने मी काहीसा निराश झालो होतो. परंतु या शतकामुळे पुन्हा आत्मविश्वास बळावला आहे. विशेष म्हणजे माझ्यापेक्षा माझे वडील यावेळी अधिक आनंदी असतील,’’ असे हार्दिक म्हणाला. एकेकाळी दररोज पहाटे पाच वाजता उठून क्रिकेटच्या सरावासाठी बोईसरहून मुंबई गाठणाऱ्या हार्दिकने आता पुढील आठवडय़ात रंगणाऱ्या सी. के. नायडू स्पर्धेत कामगिरीतील सातत्य कायम राखण्याचे ध्येय बाळगले आहे.

दुसरीकडे वडिलांच्या व्यवसायामुळे तीन वर्षे दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळल्यानंतर पुन्हा मुंबईत परतलेला आकर्षित म्हणाला की, ‘‘वयाच्या १०व्या वर्षांपासून मी अमरे यांचे मार्गदर्शन घेत असून त्यांच्यामुळेच मी आज इथवर पोहोचलो आहे. प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यात झळकावलेल्या शतकाची तुलना कोणत्याही खेळीशी होऊ शकत नाही. कुटुंबीयांनी मला क्रिकेटवरचे प्रेम जोपासण्याची संधी दिल्यामुळे मी त्यांचा कायमस्वरूपी ऋणी राहीन.’’  महेंद्रसिंह धोनीला आदर्श मानणारा आकर्षित आता प्रामुख्याने क्लबस्तरीय आणि मुंबई ट्वेन्टी-२० लीगसाठी कसून सराव करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 2:49 am

Web Title: mumbai found hardik tamore and aakarshit gomel best opening players for future zws 70
Next Stories
1 भारत-न्यूझीलंड  सराव सामना : मयांक, पृथ्वी, शुभमन अपयशी
2 आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारत उपांत्य फेरीत
3 रणजी करंडक  क्रिकेट स्पर्धा :  महाराष्ट्रावर पराभवाचे सावट
Just Now!
X