क्रिकेटसह हॉकीही आवडते

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. याच १९-वर्षांखालील एकदिवसीय सुपर लीग स्पर्धेत माझी सर्वोच्च धावसंख्या होती २२. निवड समितीची, माझी स्वत:कडूनही फार मोठी अपेक्षा होती. पण चुका सातत्याने होत होत्या. मानसीक संतुलन ढेपाळत चाललं होतं. काय करावं सुचत नव्हतं. त्यावेळी आई-बाबांनी माझी समजूत काढली. आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तुझ्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे. फक्त हा काळ सरू दे, तू यशाचे एव्हरेस्ट सर करशील, असे त्यांना मला सांगितले. पाठिंबा दिला. चुकांच्या राखेतून उठण्याचं बळ दिलं आणि त्यामुळेच मी आज द्विशतकी भरारी घेऊ शकले, असे जेमिमा रॉड्रिग्स सांगत होती.

रविवारी औरंगाबादमध्ये मुंबई आणि सौराष्ट्र यांचा एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात १६३ चेंडूंत जेमिमाने नाबाद २०२ धावांची खेळी साकारली.

गेल्या सामन्यात मी १७८ धावा केल्या होत्या. त्यावेळी बाबांनी सांगितलं की, तू चांगली खेळलीस, पण तू जर नाबाद राहून द्विशतक झळकावलं असतं तर हा आनंद काही औरच असला असता. त्यावेळी मी द्विशतक झळकावण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. या सामन्यासाठी द्विशतकाचं लक्ष्य मी डोळ्यापुढे ठेवलंही होतं. पण मैदानात उतरल्यावर मात्र ५० षटके खेळून काढण्याची रणनिती आखली आणि बाबाचं द्विशतकाचं स्वप्न साकार केलं. द्विशतक झळकावल्याचा आनंद शब्दांमध्ये मांडता येणार नाही. पण मी तो क्षण जगले, त्यातच सारं काही आलं, असं जेमिमा म्हणाली.

जेमिमा मुंबईतील वांद्रे येथे राहते. सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले, आता रिझवी महाविद्यालयात ती शिकत आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मुलांच्या १४ आणि १६ वर्षांखालील क्रिकेट शिबीरात तिची निवड झाली आणि याचा तिला भरपूर फायदा झाला. गेल्या मोसमात ४६ सामन्यांमध्ये तिने जवळपास २३०० धावा केल्या. त्यावेळी तिची सरासरी ५० धावांची होती. यामध्ये चार शतके आणि बऱ्याच अर्धशतकांचा समावेश होता. पण यावर्षी तिची सरासरी ३०० धावांची आहे. या बदलाबद्दल जेमिमा म्हणाली की, गेल्यावर्षी शतकांपेक्षा माझी अर्धशतके जास्त होती. गेल्या वर्षी मी वरिष्ठ विभागीय स्पर्धेत खेळली होती. त्यावेळी भारतासाठी खेळणाऱ्या मुलींची आणि माझी तंदुरस्ती यामध्ये मला तफावत जाणवली. त्यावेळी मी व्यायामशाळेत गेली आणि तंदुरुस्तीवर भर दिला. अर्धशतकानंतर शतक, शतकानंतर दीडशतक आणि आता द्विशतक हे चुकांमधून शिकून मी करू शकले आहे.

मुंबईचा विजय

मुंबई : सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी जेमिमा रॉड्रिग्स ही तिसरी मुंबईकर क्रिकेटपटू ठरली आहे. १९ वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट सुपर लीग स्पर्धेमध्ये जेमिमाने नाबाद २०२ धावांची अद्भुत खेळी साकारली. भारताने हा सामना २८५ धावांनी जिंकला.

मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये औरंगाबाद येथे हा एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात जेमिमाने १६३ चेंडूंत नाबाद २०२ धावांची खेळी साकारली.  यापूर्वी या स्पर्धेत जेमिमाच्या नावावर दोन शतके असून स्पर्धेतील तिची सरासरी ३०० एवढी आहे. जेमिमाच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने ५० षटकांमध्ये २ बाद ३४७ अशी मजल मारली आहे. या खेळीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जेमिमाला खेळण्याची संधी कधी मिळते, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात जेमिमाने १३व्या वर्षीच स्थान मिळवले होते. चार वर्षांनंतर जेमिमाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेटबरोबर जेमिमाने मुंबईच्या १७ वर्षांखालील हॉकी संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

क्रिकेटसह हॉकीही आवडते

क्रिकेट आणि हॉकी हे दोन्हीही खेळ मला आवडतात. अजूनही हॉकी संघटनेमधून मला खेळण्याची विचारणा होते. पण क्रिकेट खेळताना हॉकीसाठी वेळ मिळत नाही. क्रिकेटमध्ये मला वरिष्ठ खेळाडूंबरोबर सराव करण्याची शिबीरामध्ये संधी मिळाली, तेव्हा बाबांनी मला क्रिकेटवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. पण हॉकी अजूनही सोडलेली नाही, असे जेमिमा सांगत होती.

हॉकीचा फायदा

हॉकी हा क्रिकेटपेक्षा जलद खेळ आहे. त्यामुळे हॉकीचा फायदा मला क्रिकेट खेळताना भरपूर झाला. हॉकीमधून सर्वात जास्त तंदुरुस्तीचा फायदा झाला. हॉकीमुळे धावा काढण्याची क्षमता वाढली. क्रिकेटच्या बॅटच्या मानाने हॉकी स्टीक पातळ असते, त्यामुळे चेंडू सहजपणे बॅटवर यायला मदत झाली, असे जेमिमाने सांगितले.

भारताकडून खेळायचयं

आता मी द्विशतक झळकावले असले तरी पाय अजूनही जमिनीवरच आहेत. भारतीय संघात खेळण्याचे माझे ध्येय आहे. भारतीय संघाकडून दोनशे धावा करण्याची इच्छा आहे, असे जेमिमा म्हणाली.

रोहित शर्मा आदर्श

रोहित शर्मा, हा माझ्यासाठी आदर्श खेळाडू आहे. रोहित ज्या सहजपणे खेळतो, ते आवडते. त्याची फलंदाजी नजरेचे पारणे फेडणारी असते. तो खेळत असताना नजर कुठेही हलत नाही, असे जेमिमाने सांगितले.