नवी दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईच्या सुहानी लोहीयाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. ८ वर्षांखालील मुलीच्या गटात सुहानीने हे यश संपादन केलं आहे.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सुहानीने या स्पर्धेत ७ पैकी ५.५ गुण मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केलं. सुहानी आणि तिचे प्रतिस्पर्धी हिया पांचाळ यांच्यात सर्वप्रथम बरोबरी झाली. मात्र त्यानंतर टायब्रेकरच्या सामन्यात हियाने सुहानीवर मात करत रौप्यपदक आपल्या नावे केलं, आणि सुहानीला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

कर्नाटकच्या शेफाली ए.एन हिने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने या स्पर्धेत ६ गुणांची कमाई करत पहिला क्रमांक मिळवला. सुहानी ही मुंबईतल्या धीरुभाई अंबानी शाळेची विद्यार्थिनी असून दक्षिण मुंबई बुद्धीबळ अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. सुहानीच्या या विजयाबद्दल तिचे प्रशिक्षक बालाजी गुट्टला यांनी कौतुक केलं आहे. इतक्या लहान वयात सुहानीने मिळवलेलं यश पाहून आगामी काळात अनेक तरुण मुलं बुद्धीबळाकडे वळण्याची शक्यता गुट्टला यांनी बोलून दाखवली आहे. याआधीही नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुहानीने रौप्य पदकाची कमाई केली होती.