शिवछत्रपती पुरस्कार संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने पुरस्कार वितरणाला हिरवा कंदिल दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे मंगळवारी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होणारा पुरस्कार वितरण सोहळा ठरल्याप्रमाणे होणार आहे. मागील तीन वर्षांचे पुरस्कार या समारंभात वितरित करण्यात येणार आहे.
एका जनहित याचिकेवर आदेश देताना, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. जे. वझीफदार आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांनी म्हटले आहे की, शिवछत्रपती आदी तीन वर्षांच्या एकत्रित वितरण समारंभास मनाई देत नाही, पण हे पुरस्कार दिले गेले, तर न्यायालयाने यापुढे दिलेले आदेश बंधनकारक राहतील. राष्ट्रीय जलतरण शर्यतीत तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकेक पदक मिळवणाऱ्या कृणाल भोसलेच्या आईने केलेल्या जनहित याचिकेत अनेक धोरणात्मक आक्षेप नोंदवले होते.
भोसले यांच्यासह, राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत एक सुवर्ण पदक आणि किमान चार कांस्यपदके पटकावणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या सायली गुढेकरनेही न्यायालयाकडे धाव घेतली होती. जिब्राल्टरची खाडी पोहणाऱ्या संतोष पाटीलने साहस पुरस्कारासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
सायली गुढेकर व संतोष पाटील यांच्याबाबत न्यायमूर्तीनी म्हटले आहे, त्यांच्या अर्जाबाबतच्या सुनावणीत त्यांना काय अधिक दिलासा द्यायचा ते ठरवले जाईल. या प्रकरणी अर्जदार स्वतंत्रपणे (न्याय मिळवण्याचे) अन्य मार्ग अवलंबू शकतात.