हॉकीचे तीनतेरा – भाग-४
भारताला आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय हॉकीपटू देणाऱ्या मुंबईची हॉकी सध्या गाळात रुतत आहे. हॉकीपटूंची खाण असलेल्या मुंबईतील हॉकीची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. मुंबई हॉकी असोसिएशन वगळता मोजक्याच ठिकाणी सध्या हॉकी खेळली जात आहे. गाळात रुतलेल्या हॉकी खेळाला बाहेर काढण्याऐवजी, नामांकित स्पर्धाना पुनरुज्जीवन देण्याऐवजी सध्या हॉकीचे राजकारण सुरू आहे. यामुळेच मुंबई हॉकीचे तीनतेरा वाजले आहेत.
भारतीय संघाचे माजी गोलरक्षक मीर रंजन नेगी म्हणाले की, ‘‘मुंबईतीलच नव्हे तर देशातील हॉकीचा श्वास कोंडला आहे. पूर्वी मुंबईचे ग्लॅमर खेळाडूंना आकर्षित करायचे. दिवसभर सराव केल्यानंतर मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंटवर जाऊन ते मुंबईची मजा लुटत असत. मुंबईत जितकी हॉकी खेळली जाते, तितकी हॉकी देशातल्या कुठल्याही भागात खेळली जात नाही. म्हणूनच मुंबईतून देशाला सर्वाधिक हॉकीपटू मिळाले. मात्र मुंबईतील जुन्या स्पर्धाना पुन्हा नवी झळाळी द्यायला हवी. खेळाडूंना नोकऱ्या मिळायला हव्यात. तसेच पुरस्कर्त्यांनी पुढे यायला हवे, तरच मुंबईतील हॉकी पूर्वीसारखा श्वास घेऊ शकेल. गेल्या वर्षी वर्ल्ड सीरिज हॉकी स्पर्धेदरम्यान लोकांची तिकिटांसाठी झुंबड उडाली होती. विद्युतप्रकाशझोतात चाहत्यांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला होता. तशाच स्वरूपाच्या स्पर्धा आयोजित करून हॉकीचा चाहतावर्ग टिकवायला हवा. राजकारण करण्यापेक्षा हॉकीच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे. अन्यथा, हॉकी हा खेळ रसातळाला पोहोचेल.’’
भारतीय संघातील मुंबईचा युवा हॉकीपटू युवराज वाल्मीकी म्हणतो, ‘‘मुंबईत हॉकी खेळण्यासाठी एकच अ‍ॅस्ट्रो-टर्फ मैदान आहे. एमएचएवरील स्पर्धा संपल्यानंतर केवळ २-३ तासच आम्हाला स्टेडियमवर सराव करता येतो. इतर वेळी आम्ही मातीत हॉकीचा सराव करायचो. आमच्या वेळी आम्हाला आठवडय़ातून ३-४ वेळा मैदान सरावासाठी मिळायचे. दर्जेदार हॉकीपटू घडवण्यासाठी अ‍ॅस्ट्रो-टर्फवर सराव करणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी अ‍ॅस्ट्रो-टर्फची संख्या वाढवायला हवी.’’
शाळा, महाविद्यालयांमध्ये खेळल्या जाणाऱ्या हॉकीविषयी भाष्य करताना युवराज म्हणाला की, ‘‘शाळा, महाविद्यालयीन स्पर्धामध्ये चांगले खेळाडू भाग घेतात. पण त्यांचा सहभाग हा फक्त २५ मार्कापुरताच असतो. शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रीमंत घरातील मुले हॉकी खेळणे सोडून देतात. फक्त आपल्याला हॉकीमध्ये कारकीर्द घडवायची आहे, त्यातूनच आपले भवितव्य सुकर होईल, या इराद्याने गरीब कुटुंबातील मुले हॉकी खेळणे कायम ठेवतात. पण त्यांच्याकडे खेळण्यासाठी ना हॉकीस्टिक असते ना चांगले शूज. मी ज्यावेळी हॉकी खेळायचो, त्यावेळी धनराज पिल्ले, एड्रियन डिसूझासारख्या खेळाडूंनी मला मदत केली आहे. देशासाठी मी हॉकी खेळू शकेन, याचा विचारही माझ्या मनात आला नव्हता.’’
चांगले हॉकीपटू घडवण्यासाठी माजी खेळाडूंनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे तो सांगतो. ‘‘काही माजी खेळाडूंनी हॉकी अकादमी स्थापन केल्या आहेत. पण त्यांच्याकडे ना निधी आहे ना पुरस्कर्ते. माजी हॉकीपटूंनी उभरत्या खेळाडूंना आपल्याकडील अनुभव सांगण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. भारतीय संघात असताना हॉकीचे तंत्र, तंदुरुस्ती आणि अनेक गोष्टी मी शिकत असतो. मुंबईत आल्यानंतर त्या युवा खेळाडूंना सांगत असतो. असे झाले तरच चांगले हॉकीपटू तयार होऊ शकतील.’’     (समाप्त)