मुंबई हॉकी असोसिएशनच्या (एमएचए) निवडणुकीच्या मैदानावर रंगलेल्या खेळाडू विरुद्ध सत्ताधारी या सामन्यात सत्ताधारी गटाने हुकूमत गाजवताना खेळाडू गटाचा धुव्वा उडवत आपले संस्थान कायम राखले. जवळपास दीडशे ते दोनशे मतांच्या फरकाने सत्ताधारी गटाने खेळाडूंच्या गटाला लीलया पराभूत केले. अध्यक्षपदासाठी रंगलेल्या मंगा सिंग बक्षी आणि ऑलिम्पिकपटू गुरबक्ष सिंग ग्रेवाल यांच्यात बक्षी यांनी २४८ मतांसह विजय मिळवला. ग्रेवाल यांना ६६ मतांवर समाधान मानावे लागले. एकूण १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने सर्व जागा जिंकून पुढील तीन वर्षांसाठी एमएचएचा कारभार आपल्या हातात ठेवला आहे.
मंगा सिंग बक्षी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या समितीने मुंबई हॉकी संपविली, असा दावा करत ग्रेवाल गटाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत जेतेपदाचा निर्धार व्यक्त केला होता, परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत एमएचए सदस्यांनी सत्ताधारी गटालाच पसंती दिली. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या चौरंगी लढतीत सत्ताधारी गटाच्या बाल मलकित सिंग (२३५) आणि गुरदीप सिंग चंढोक (२१७) यांनी बाजी मारली. येथेही ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मव्‍‌र्हिन फर्नाडिस आणि आंतरराष्ट्रीय पंच सतिंदर सिंग वालिया यांना अनुक्रमे ७० व ६३ मतांसह पराभव पत्करावा लागला. सचिवपदासाठीच्या निवडणुकीत विद्यमान सचिव राम सिंग राठोड (२२९) यांनी ऑलिम्पिकपटू जोकीम काव्‍‌र्हालो (८३) यांना १४६ मतांनी पराभूत केले. खजिनदारपदावर बाल गोविंद चोखानी यांनी २४७ मतांसह पुन्हा एकदा दावा प्रस्थापित केला आहे. या पदासाठी रिंगणात उतरलेल्या रणवीर सिंग यांना ६२ मतांवर समाधान मानावे लागले. एकमेव महिला उमेदवार नीना राणे यांना ७२ मत मिळाली.

कार्यकारिणी (मतदान)
अध्यक्ष : मंगा सिंग बक्षी (२४८)
उपाध्यक्ष : बाल मलकित सिंग (२३५), गुरदीप सिंग चंढोक (२१७)
सचिव : राम सिंग राठोड (२२९)
खजिनदार : बाल गोविंद चोखानी (२४७)
सदस्य : मीर रंजन नेगी (२५७), व्हेर्नोन लोबो (२४९), पुरन सिंग (२४७), डॅरी डी’सुजा (२३८), राजिंदर सिंग परमार (२३०), मुखविंदर गिल (२२६), कुलविंदर बक्षी (२१७), एम. पी. अग्रवाल (२१३), बलजित चौधरी (२०७).