मुंबईच्या डोंगराएवढय़ा आव्हानापुढे बडोद्याचा संघ तिसऱ्या दिवसअखेर खुजा वाटू लागला. उपांत्य फेरीतील स्थान आवाक्यात दिसू लागल्याने मुंबईचा कर्णधार अजित आगरकरही निर्धास्त होता. मुंबईने ९ बाद ६४५ धावांवर डाव घोषित केल्यानंतर उत्तरार्धात बडोद्याचा निम्मा संघ फक्त १६७ धावांत गारद केला. त्यामुळे फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी बडोद्याला आणखी २७९ धावांची आवश्यकता आहे.
मंगळवारी सकाळच्या सत्रात अभिषेक नायर वैयक्तिक १३२ धावांवर बाद झाला. त्यानंतर जावेद खान आणि अजित आगरकर यांनी वेगाने धावा काढल्या. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ८१ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी करून मुंबईला साडेसहाशेच्या आसपास नेले. ५४ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांसह धडाकेबाज ४३ धावा काढणारा जावेद भार्गव भटच्या गोलंदाजीवर मूर्तुजा वहोराकडे झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर आगरकरने ४ चौकारांच्या सहाय्याने आपले १६ वे प्रथम श्रेणीतील अर्धशतक झळकावल्यावर मुंबईचा पहिला डाव घोषित केला. ३९वेळा रणजी विजेत्या मुंबईने बडोद्याविरुद्ध याआधी १९४५-४६मध्ये ६४५ धावा उभारल्या होत्या. त्या विक्रमाची मंगळवारी मुंबईने बरोबरी केली. त्यानंतर आदित्य वाघमोडे आणि सौरभ वाकस्कर यांनी दमदार शतकी सलामी नोंदवत मुंबईच्या गोलंदाजांना झगडायला लावले. हा सामना सहजगत्या मुंबईला जिंकता येणार नाही, याची झलक दुसऱ्या सत्रात मिळाली. पण तिसऱ्या सत्रात मुंबईच्या गोलंदाजांनी सारेच चित्र पालटवून टाकले. चहापानानंतर पदार्पणवीर विशाल दाभोळकरने वाकस्करचा अडसर दूर करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. दाभोळकर आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत बडोद्याच्या आघाडीच्या फळीला हादरविले. बडोद्याचा कर्णधार युसूफ पठाणने १८ चेंडूंत दोन चौकारांनिशी २१ धावा काढत आपला धडाका सुरू केला. पण अनुभवी आगरकरने पठाणला तंबूची वाट दाखवत तिसऱ्या दिवसअखेरीस मुंबईच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यावरील नियंत्रणावर शिक्कामोर्तब केले. अखेरच्या सत्रातील २९ षटकांत बडोद्याने ७४ धावा केल्या, पण त्यांचे ५ फलंदाज बाद झाले. खेळ थांबला तेव्हा अंबाती रायुडू १० आणि पिनल शाह ६ धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : २०४ षटकांत ९ बाद ६४५ डाव घोषित (वसिम जाफर १५०, सचिन तेंडुलकर १०८, अभिषेक नायर १३२, आदित्य तरे ६४, अजित आगरकर नाबाद ५२, जावेद खान ४३; मूर्तुजा वहोरा ४/११९) बडोदा (पहिला डाव) : ६४ षटकांत ५ बाद १६७ (आदित्य वाघमोडे ५३, सौरभ वाकस्कर ५१; धवल कुलकर्णी २/४१, विशाल दाभोळकर २/४३)

रणजी क्रिकेट स्पर्धा : सेनादल उपान्त्य फेरीत
पीटीआय,  इंदूर
रजत पालिवाल (नाबाद ३२) व जखमी फलंदाज सौमिक चटर्जी (नाबाद ३४) यांच्या झुंजार खेळामुळेच सेनादलाने उत्तर प्रदेशला पाच गडी राखून पराभूत केले आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपान्त्य फेरी गाठली. विजयासाठी केवळ ११३ धावांचे आव्हानास सामोरे जाताना सेनादलाची एकवेळ ५ बाद ५४ अशी स्थिती होती. उत्तर प्रदेशच्या अंकित रजपूतने ३६ धावांत हे पाचही बळी घेतले होते. मात्र पालिवाल व चटर्जी यांनी अखंडित भागीदारी करीत संघास विजय मिळवून दिला. चटर्जीने गुडघ्यास मोठी दुखापत होऊनही फलंदाजी केली.संक्षिप्त धावफलक-उत्तर प्रदेश १३४ व २४१ (तन्मय श्रीवास्तव ५५, आयरीश आलम ५०, सूरज यादव ७/७१).सेनादल-२६३ व ५ बाद ११६ (रजत पालिवाल नाबाद ३२, सौमिक चटर्जी नाबाद ३४, अंकित रजपूत ५/३६).