26 February 2021

News Flash

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबई फॉलोऑनच्या छायेत

विदर्भाच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे सहा गडी पहिल्या डावात केवळ १६९ धावांवर माघारी परतले.

अक्षय वखरे

विदर्भ पहिल्या डावात ५११; मुंबई ६ बाद १६९

नागपूर : विदर्भाच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे सहा गडी पहिल्या डावात केवळ १६९ धावांवर माघारी परतले. त्यामुळे तळाच्या चार फलंदाजांसह मुंबईला फॉलोऑन वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. विदर्भाने पहिल्या डावात तब्बल ५११ धावांचा डोंगर उभारला असून मुंबई अजूनही ३४२ धावांनी पिछाडीवर आहे. मंगळवारी विदर्भ उर्वरित चार गडी झटपट बाद करून मुंबईवर फॉलोऑन देण्याची चिन्हे आहेत.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. विदर्भाने पहिल्या डावात तब्बल ५११ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या दिवशी वसीम जाफरने केलेल्या १७८ धावांची खेळी आणि अथर्व तायडे, गणेश सतीश व मोहित काळेची अर्धशतकीय खेळीच्या बळावर विदर्भाने मोठी धावसंख्या उभारली. पहिल्या दिवसअखेर विदर्भाने केवळ चार गडी गमावून ३८९ धावा केल्या. गणेश ७७ तर मोहित ३३ धावांवर असताना दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली. गणेश सतीश शतकापासून केवळ दहा धावा दूर असताना बाद झाला आणि त्याची खेळी ९० धावांवर संपुष्टात आली. मोहितला ध्रमिल मटकरने ६८ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर अपूर्व वानखेडे (२५) आणि तळातील फलंदाज झटपट बाद झाले. विदर्भाने पहिल्या डावात ५११ धावांपर्यंत मजल मारली. ध्रमिलने सर्वाधिक पाच गडी बाद केले.

फलंदाजीला आलेल्या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. मुंबई २१ धावांवर असताना सलामीवीर विक्रांत ऐतीला फिरकीपटू अक्षय वखरेने सात धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार सिद्धेश लाड (३) तर श्रेयस अय्यर (०) धावा करून परतले आणि मुंबईची ३ बाद ३१ धावा अशी बिकट अवस्था झाली. मात्र सलामीवीर जय बिस्ता आणि शुभम राजनेने मुंबईला बऱ्यापैकी सावरले आणि ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र अर्धशतक साजरे करणाऱ्या जयला अक्षय वखरेने झेलबाद केले. जयने १११ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. दुसरीकडे शुभमने अर्धशतक करताच अक्षय वखरेने त्यालाही परतवून लावले.

शुभमने ७६ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्यानंतर आदित्य तरेही १२ धावावर बाद झाला. दिवसअखेर मुंबईने सहा गडी गमावून १६९ धावा केल्या. मुंबईचे सहा गडी तंबूत रवाना झाल्याने तिसऱ्या दिवशी विदर्भ मुंबईवर फॉलोऑन लादण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या दिवसअखेर शिवम दुबे २१ तर ध्रमिल मटकर (६) धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक : 

विदर्भ (पहिला डाव) ५११ (वासीम जाफर १७८, अथर्व तायडे ९५, गणेश सतीश ९०, मोहित काळे ६८; ध्रमिल मटकर ५/१४१).

मुंबई (पहिला डाव) ६ बाद १६९ (जय बिस्त ६४, शुभम राजने ५२; अक्षय वखरे ४/५५).

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 11:26 pm

Web Title: mumbai in trouble against vidarbha in ranji trophy match
Next Stories
1 IND vs AUS : रोहित शर्मा बाहेर, सिडनी कसोटीत या तिघांपैकी एकाला मिळणार संधी
2 फेडरर-सेरेनामध्ये झुंज रंगणार
3 कमिन्स, स्टार्क, हेझलवूडला एकदिवसीय मालिकेत विश्रांती
Just Now!
X