चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा रुबाब पाहण्याजोगा असतो. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरही नेमका तोच आविर्भाव मुंबई इंडियन्सच्या कामगिरीतून दिसून येतो. रविवारी सुटीच्या दिवशी मुंबईकरांना महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई आणि सचिन तेंडुलकरचा मुंबई या संघांमधील आयपीएल टक्कर पाहायला मिळणार आहे.
सलग सात विजयांनिशी घोडदौड करणारा चेन्नईचा संघ मुंबई जिंकण्यासाठी डेरेदाखल झाला आहे. याशिवाय चेन्नई हा यंदाचा एकमेव संघ आहे, ज्याने प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानांवरील चारही सामने आतापर्यंत जिंकले आहेत. मुंबईच्या संघाने चेपॉकवर चेन्नईला हरविण्याचा पराक्रम या स्पध्रेत दाखविला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघसुद्धा त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे.
या दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या सहाव्या पर्वाच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ ११ सामन्यांतील नऊ विजयांसह १८ गुण मिळवून अग्रस्थानावर आहे. तथापि, मुंबईचा संघ सहा विजयांनिशी १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
रिकी पॉन्टिंगऐवजी रोहित शर्माकडे नेतृत्वाची धुरा सोपविल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला संजीवनी प्राप्त झाली होती. या संघाने ओळीने तीन विजय मिळवले होते, परंतु सनरायजर्स हैदराबादने त्यांची ही विजयाची मालिका रोखली आहे. पण तरीही मुंबई इंडियन्सची फलंदाजीची फळी स्थिर आहे. त्यांना उर्वरित सहा सामन्यांपैकी चार घरच्या मैदानावर खेळायचे आहेत.
घरच्या मैदानावर मुंबईने दिल्ली  डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पुणे वॉरियर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांनी मोठय़ा धावसंख्या रचल्या आहेत.
सलामीवीर ड्वेन स्मिथ चांगला फॉर्मात आहे. फक्त सहा सामन्यांत त्याच्या खात्यावर दोन अर्धशतकांसह १९४ धावा जमा आहेत. सचिन तेंडुलकरला चालू हंगामात फक्त एकमेव अर्धशतक साकारता आले आहे. त्याने १० सामन्यांत १७१ धावा केल्या आहेत. मधल्या फळीत यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक, कर्णधार शर्मा, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड यांचा समावेश आहे.
चेन्नईची मदार आहे ती माइक हसीवर. वृद्धिमान साहा, धोनी आणि सुरेश रैना यांच्यासह रवींद्र जडेजा, अ‍ॅल्बी मॉर्केल आणि ड्वेन ब्राव्हो फॉर्मात आहेत.

* सामना : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज<br />* स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई
* वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून

ए बी डीव्हिलियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू</strong>
एक मोठ्ठा दिवस.. सलग विमानाने जयपूरमध्ये दाखल झालो आहोत.. जेवण उत्तम आहे आणि खूप छान झोप घेण्याचा माझा विचार आहे!