News Flash

मुंबईच अव्वल!

मॅक्क्लेघनचा भेदक मारा

मुंबईच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांची भंबेरी उडाली.

दिल्लीवर १४ धावांनी विजय; मॅक्क्लेघनचा भेदक मारा

फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नसली तरी भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने विजयाचा षटकार लगावला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईला १४२ धावा करता आल्या असल्या तरी त्यांनी मिचेल मॅक्क्लेघनच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सची ६ बाद २४ अशी दयनीय अवस्था केली होती. ख्रिस मॉरिस आणि कॅगिसो रबाडा यांनी दमदार भागीदारी रचली खरी, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. मुंबईने दिल्लीवर १४ धावांनी मात करत गुणतालिकेतील अव्वल स्थान अबाधित ठेवले.

नाणेफेक जिंकत दिल्लीने मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि शिस्तबद्ध मारा करत त्यांना १४२ धावांपर्यंत रोखण्यात त्याला यश आले. पदार्पण करणाऱ्या कॅगिसो रबाडाने पार्थिव पटेलला (८) बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. पण जोस बटलरने (२८) मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. ११ धावांवर असताना त्याला जीवदानही मिळाले होते, पण या जीवदानाचा फायदा त्याला घेता आला नाही आणि धावचीत होऊन त्याने आत्मघात केला. फॉर्मात असलेल्या नितीश राणाला (८) पॅट कमिन्सने उत्तम सापळा रचून तंबूचा रस्ता दाखवला. कमिन्सने आखूड चेंडू टाकत राणाला फटका मारण्याचे प्रलोभन दाखवले, त्या आमिषाला बळी परत कोरे अँडरसनकडे झेल देऊन तो बाद झाला. राणा बाद झाल्यावर मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. फॉर्मात नसलेला रोहित शर्माही (५) जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही आणि मुंबईची ५ बाद ८४ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर किरॉन पोलार्ड (२६) आणि हार्दिक पंडय़ा (२४) यांनी सहाव्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी रचत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. अखेरच्या षटकात फारशी फटकेबाजी करत न आल्याने मुंबईला १४२ धावा करता आल्या. कमिन्स आणि अमित मिश्रा यांनी टिच्चून मारा करत मुंबईच्या धावसंख्येला लगाम घातला.

मुंबईच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. मिचेल मॅक्क्लेघनने अप्रतिम पहिला स्पेल टाकत दिल्लीचे कंबरडे मोडले. पहिल्या दोन षटकांच्या स्पेलमध्ये फक्त सात धावा देत फॉर्मात असलेला संजू सॅमसन (९), श्रेयस अय्यर (६) आणि कोरे अँडरसन (०) यांना बाद करत मुंबईला नेत्रदीपक यश मिळवून दिले. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंडय़ा यांनीही त्यानंतर अचूक मारा करत दिल्लीवर अंकुश कायम ठेवला आणि त्यांची ६ बाद २४ अशी दयनीय अवस्था केली. आपल्या बहुमूल्य विकेट मुंबईच्या गोलंदाजांना आंदण देण्याचा दिल्लीच्या फलंदाजांनी सपाटा लावला होता. या सहाही फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. पण त्यानंतर रबाडा आणि ख्रिस मॉरिस या तळाच्या फलंदाजांना मुंबईच्या नाकी नऊ आणले होते. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचत संघाला विजयाची आशा दाखवली. पण बुमराहने १९व्या षटकात रबाडाला बाद करत ही जोडी फोडली. रबाडाने ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या. मॉरिसने अखेरच्या षटकापर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. मॉरिसने पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५२ धावा फटकावल्या. मुंबईकडून मॅक्क्लेघनने तीन आणि बुमराहने दोन फलंदाजांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १४२ (जोस बटलर २८, किरॉन पोलार्ड २६; अमित मिश्रा २/१८) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ७ बाद १२८ (ख्रिस मॉरिस नाबाद ५२, कॅगिसो रबाडा ४४; मिचेल मॅक्क्लेघन ३/२४, जसप्रीत बुमराह २/२१)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 2:23 am

Web Title: mumbai indians beat delhi daredevils by 14 runs
Next Stories
1 सुपरमॅन!
2 धोनी पुण्यासाठी तारणहार!
3 भारतीय संघाची अग्निपरीक्षा