किंग्ज इलेव्हन पंजाबवर २५ धावांनी मात; पार्थिव पटेल, अंबाती रायुडूची अर्धशतकी खेळी
मोक्याच्या क्षणी होणाऱ्या चुका टाळत मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत किंग्ज इलेव्हनला नमवत विजयपथावर परतला. ‘नाणेफेक जिंका आणि सामनाही जिंका’ हा यंदाच्या हंगामातला विजयमंत्र पंजाबला भाग्यदायी ठरला नाही. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १८९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेलच्या भागीदारीने पंजाबच्या आशा पल्लवित केल्या. मात्र मार्श बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाजांना वाढत्या धावगतीचे आव्हान पेलवले नाही.
मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना मनन व्होरा ७ धावांवर बाद झाला. मुरली विजय १९ धावा करुन तंबूत परतला. मार्श व मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. . टीम साऊदीने मार्शला बाद करत ही जोडी फोडली. मार्शने ३४ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने मॅक्सवेलची खेळी संपुष्टात आणली. त्याने ५ चौकार व एका षटकारासह ३९ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. पंजाबने १६४ धावा केल्या. मुंबई इंडियन्सतर्फे जसप्रीत बुमराहने ३ तर टीम साऊदी व मिचेल मॅक्क्लेघनने प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी, पार्थिव पटेल आणि अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने १८९ धावांची मजल मारली. कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला. मात्र यानंतर पटेल-रायुडू जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने रायुडूला बाद केले. त्याने ३७ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. १३ चेंडूंत २४ धावांची उपयुक्त खेळी करून जोस बटलर बाद झाला. पार्थिव पटेलला मिचेल जॉन्सनने बाद केले. त्याने ५८ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांसह ८१ धावांची खेळी साकारली. मोहित शर्माने किरॉन पोलार्ड (१०) व हार्दिक पंडय़ा (०) यांना बाद करत मुंबईच्या धावगतीला वेसण घातली. पंजाबतर्फे मोहित शर्माने ३८ धावांत ३ बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १८९ (पार्थिव पटेल ८१, अंबाती रायुडू ६५; मोहित शर्मा ३/३८) विजयी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ७ बाद १६४ (ग्लेन मॅक्सवेल ५६, शॉन मार्श ४५, जसप्रीत बुमराह ३/२६)
.