मुंबई इंडियन्सचा सफाईदार विजय; रोहितची दिमाखदार फलंदाजी

कर्णधार रोहित शर्माने केलेल्या दिमाखदार खेळाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर आठ विकेट्स राखून मात केली. घरच्या मैदानावरील चौथ्या सामन्यातही पुण्याचा पराभव झाला.

मुंबई व पुणे या दोन्ही महाराष्ट्रीयन संघांमध्ये महाराष्ट्रदिनी ही लढत होती, त्यामुळे जवळपास २५ हजार प्रेक्षकांनी या लढतीचा आनंद घेतला. सौरभ तिवारी व स्टिव्हन स्मिथ यांनी केलेल्या ८४ धावांच्या भागीदारीमुळेच पुण्याने २० षटकांत ५ बाद १५९ धावांपर्यंत मजल गाठली. शर्माने ६० चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह साकारलेल्या नाबाद ८५ धावांच्या खेळीमुळे मुंबईने हे आव्हान १८.३ षटकांत पार केले.

नाणेफेक जिंकून मुंबईने क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर अजिंक्य रहाणे (४)  झटपट बाद झाला. मात्र स्मिथ व तिवारी यांनी ४५ चेंडूंत ८४ धावांची भर घातली. स्मिथने ४ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा केल्या. तिवारीने ४४ चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह ५७ धावा केल्या.

पार्थिव पटेल (२१)  बाद झाल्यावरही मुंबईने षटकामागे आठ धावांचा वेग ठेवला. रोहित शर्माने अंबाती रायुडू (२२) सोबत ७.४ षटकांत ५२ धावांची भागीदारी केली. जोस बटलरनेही (नाबाद २७) आत्मविश्वासाने खेळ करीत शर्माला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

रायझिंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ५ बाद १५९ (सौरभ तिवारी ५७, स्टिव्हन स्मिथ ४५; जसप्रित बुमराह ३/२९) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १८.३ षटकांत २ बाद १६१  (रोहित शर्मा नाबाद ८५, जोस बटलर नाबाद २७; आर. अश्विन १/२१)

सामनावीर : रोहित शर्मा.