रोहित शर्मा, किरॉन पोलार्डची दमदार फलंदाजी;रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहा विकेट्सनी मात
रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमध्ये विजयपथावर परतला. वानखेडे स्टेडियमवर बुधवारी मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्स राखून पराभव केला आणि हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली.
मुंबईचा कर्णधार रोहितने ४४ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ६२ धावांची खेळी उभारून मुंबईच्या विजयाचा पाया रचला. त्याने अंबाती रायुडू (३१) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मग किरॉन पोलार्डने १९ चेंडूंत ४ चौकार आणि ३ खणखणीत षटकार खेचून मुंबईच्या विजयाचा कळस चढवला. मुंबईला शेवटच्या चार षटकांत २८ धावा हव्या होत्या. पण केन रिचर्डसनच्या १७व्या षटकात पोलार्डने दोन षटकार मारले. मग शेन वॉटसनच्या १८व्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार मारून पोलार्डने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, आयपीएल पर्दापण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने आपल्या खेळीद्वारे जणू सावधानतेचा इशाराच दिला. हेडने २ चौकार आणि २ षटकारांसह २४ चेंडूंत ३७ धावांची अप्रतिम खेळी साकारली. त्यामुळेच बंगळुरूला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७० धावा करता आल्या.
नाणेफेक जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाठलागाला पसंती दिली. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात सहा बदल केले. मायदेशी परतलेल्या ख्रिस गेलच्या जागी स्वत:च सलामीला उतरणाऱ्या कोहलीने (३७) के. एल. राहुल (२३) सोबत ३२ धावांची सलामी नोंदवली. मग कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स (२९) यांची जोडी चांगलीच जमली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली. कोहली, डी’व्हिलियर्स आणि शेन वॉटसन (५) बाद झाल्यामुळे बंगळुरूची ४ बाद ९९ अशी अवस्था झाली. त्यानंतर हेडने सर्फराझ खानच्या (२८) साथीने पाचव्या विकेटसाठी ५.४ षटकांत ६३ धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहच्या अखेरच्या षटकांत धावा काढण्याच्या प्रयत्नात हेड, सर्फराझ आणि स्टुअर्ट बिन्नी (१) हे तीन फलंदाज बाद झाले.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ७ बाद १७० (ट्रॅव्हिस हेड ३७, विराट कोहली ३३, ए बी डी’व्हिलियर्स २९, सर्फराझ खान २८; जसप्रित बुमराह ३/३१, कुणाल पंडय़ा २/२७) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १८ षटकांत ४ बाद १७१ (रोहित शर्मा ६२, किरॉन पोलार्ड नाबाद ३९, अंबाती रायुडू ३१, जोस बटलर २८; इक्बाल अब्दुल्ला ३/४०)
सामनावीर : रोहित शर्मा</strong>