मुंबईचा बंगळुरुवर सहा विकेट्सनी विजय
गोलंदाजी करताना एकमेव षटकांत २२ धावांची खिरापत देणाऱ्या किरॉन पोलार्डने फलंदामध्ये १९ चेंडूत ३५ धावांची निर्णायक खेळी करत मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सहा विकेट्स राखून दिमाखदार विजय मिळवून दिला. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा केल्या. संथ गतीने खेळणाऱ्या मुंबईच्या डावाला पोलार्डने गती देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिव पटेल एक धाव करुन तंबूत परतला. कर्णधार रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूने दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करताना संघाच्या विजयाचा पाया रचला. वरुण आरोनने रोहित शर्माला बाद करत ही जोडी फोडली. त्याने २५ धावा केल्या. पदार्पणवीर नितीश राणाला युझवेंद्र चहलने माघारी धाडले. एबी डी’व्हिलियर्सच्या अफलातून झेलामुळे रायुडूची चिवट खेळी संपुष्टात आणली. त्याने ४७ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. रायुडू बाद झाला तेव्हा मुंबईची ४ बाद ९८ अशी अवस्था झाली होती. धावगतीचे आव्हान वाढत असताना कीरेन पोलार्डने चौकार, षटकारांची आतषबाजी करत विजय सोपा केला. त्याने १९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावांची वेगवान खेळी साकारली. जोस बटलरने १ चौकार आणि ३ षटकारांसह ११ चेंडूत २९ धावा करत पोलार्डला उत्तम साथ दिली. या जोडीने ३.३ षटकांत ५५ फटकावल्या. बंगळुरुतर्फे वरुण आरोनने २ बळी घेतले.
तत्पूर्वी लोकेश राहुलच्या झुंजार खेळीच्या बळावर बंगळुरु संघाने १५१ धावांची मजल मारली. अफलातून फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला दुसऱ्याच षटकात मिचेल मॅक्लेघानने बाद केले. त्याने ७ धावा केल्या. धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याही सामन्यात छाप पाडू शकला नाही. टीम साऊदीने त्याला रोहित शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. एबी डी’व्हिलियर्स आणि लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी करत डाव सावरला. कृणाल पंडय़ाने डी’व्हिलियर्सला बाद करत ही जोडी फोडली. त्याने २४ धावा केल्या. यानंतर राहुलने शेन वॉटसनच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ३८ तर सचिन बेबीच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत बंगळुरुला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. राहुलने ५३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. मुंबईतर्फे टीम साऊदी, मिचेल मॅक्लेघान आणि कृणाल पंडय़ा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ४ बाद १५१ (लोकेश राहुल ६८; कृणाल पंडय़ा १/१५) पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स : १८.४ षटकांत ४ बाद १५३ (अंबाती रायुडू ४४, किरॉन पोलार्ड नाबाद ३५, जोस बटलर २९; वरुण आरोन २/३७)