मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा खेळाडूंना सल्ला

यंदा प्रथमच इंडियन प्रीमिअर लीगनंतर (आयपीएल) क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची आयसीसी विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूवर दडपण हे असणारच. भारतीय संघ गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे अतिक्रिकेटचा त्रास जाणवू नये, यासाठी प्रत्येक खेळाडूने गरज भासल्यास विश्रांती घ्यावी, असा सल्ला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने दिला आहे.

‘‘दर चार वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. ‘आयपीएल’ हीसुद्धा जगातील महत्त्वाच्या लीग स्पर्धामध्ये गणली जाते. तरीही विश्वचषकालाच आमचे प्रथम प्राधान्य राहील. दोन महिने रंगणाऱ्या ‘आयपीएल’मध्ये खेळाचा ताण कितपत ओढवून घ्यायचा, याचा निर्णय प्रत्येक खेळाडूलाच घ्यावा लागणार आहे. माझ्या मते, भारतीय संघातील सर्वच खेळाडू अतिक्रिकेटबाबत निर्णय घेण्याइतपत चाणाक्ष आहेत. मलाही जेव्हा खेळावेसे वाटेल, तेव्हा मी मैदानात उतरेन आणि जेव्हा गरज असेल, तेव्हा नक्कीच विश्रांती घेईन,’’ असेही रोहित म्हणाला.

अतिक्रिकेटविषयी रोहितने सांगितले की, ‘‘गेल्या काही दिवसांपासून मी बऱ्याच खेळाडूंशी अतिक्रिकेटविषयी चर्चा केली. पुन्हा लयीत परतण्यासाठी प्रत्येकालाच सामने खेळण्याची इच्छा आहे. पण अतिक्रिकेटचे दडपण जाणवू लागले तर दुसऱ्या खेळाडूंनाही संधी देण्याचा विचार त्यांनी केला आहे. म्हणूनच प्रत्येक सामन्यासाठी संघ समतोल राहावा, याकरिता खेळाडूंनी एकमेकांशी समन्वय राखणे महत्त्वाचे आहे.’’

युवराज सिंगला मुंबई इंडियन्समध्ये का समाविष्ट करण्यात आले, याविषयी संघ संचालक (क्रिकेट) झहीर खान यांनी सांगितले की, ‘‘लिलावाच्या पहिल्या टप्प्यात युवराजवर कुणीही बोली लावली नव्हती. माझ्यावरही लिलावात कुणीही बोली लावली नव्हती. प्रत्येक संघ रणनीती आखूनच लिलावात सहभागी होत असतो. त्यामुळे युवराजला अखेरच्या क्षणी मुंबई संघात का सामील करून घेतले, याचे उत्तर देता येणार नाही. पाचव्या-सहाव्या क्रमांकावर एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता असलेल्या युवराजच्या समावेशामुळे संघात नवचैतन्य संचारले आहे. युवराजही या संधीचे सोने करण्यासाठी उत्सुक आहे.’’

भारतीय संघातर्फे सलामीला खेळणारा रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. याविषयी विचारले असता रोहित म्हणाला की, ‘‘आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यानंतर विश्वचषकात सलामीला उतरताना माझ्या दृष्टिकोनात कोणताही फरक पडणार नाही. संघाला गरज असताना कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याची माझी तयारी असते. संघाचा समतोल राखणे सर्वात महत्त्वाचे असते. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यानंतर मला जास्त यश मिळाले आहे, हे तितकेच खरे.’’

मुंबईकर सिद्धेश लाडच्या समावेशाविषयी रोहितने सांगितले की, ‘‘देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांपैकी सिद्धेश लाड हा एक आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मुंबई इंडियन्स संघाचाच एक भाग आहे. आयपीएलमध्ये तो फारसा खेळला नसला तरी तो नक्कीच आश्चर्यकारक कामगिरी करू शकतो.’’

‘आयपीएल’मुळे संघनिवड करणे सोपे जाईल -झहीर

‘आयपीएल’मुळे देशाला आतापर्यंत चांगले खेळाडू मिळाले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाच्या स्पर्धासाठी संघनिवड करताना निवड समितीला आयपीएलची बरीच मदत झाली आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी अद्याप काही जागांचा शोध बाकी असताना, आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर विश्वचषकासाठी संघनिवड करणे सोपे जाईल, असे मत मुंबई इंडियन्सचा संचालक (क्रिकेट) झहीर खानने व्यक्त केले.                                                                                                                                                                                                                ‘‘प्रत्येक जण सध्या अतिक्रिकेटबद्दल बोलत आहे. पण ‘आयपीएल’मध्ये खेळताना खेळाडूंना दुखापती होणारच नाहीत, असे नाही. दुखापती हा खेळाचाच भाग आहे. मात्र खेळाडूंना लयीत परत येण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे, असे मला वाटते,’’ असे झहीरने सांगितले.