मुंबई इंडियन्सचा खेळाडू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं आहे. कृणाल पांड्या आयपीएल खेळून दुबईवरुन परतत असताना कस्टम विभागाकडून त्याला रोखण्यात आलं असून चौकशी सुरु आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कृणाल पांड्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू आढळल्याने त्याची चौकशी केली जात आहे.

करोनामुळे यावेळच्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम सामना जिंकत पाचव्यांदा चॅम्पिअन ठरली आहे. कृणाल पांड्यादेखील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. आयपीएल जिंकून मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी दुबईहून भारतात परतला. यावेळी कृणाल पांड्यादेखील सोबत होता. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना कृणाल पांड्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याचा संशय असल्याने चौकशी केली जात आहे.

एक वर्षाहून अधिक काळ परदेशात राहणारी व्यक्ती ५० हजारांपर्यंतचं सोन भारतात आणू शकते. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. महिलांसाठी ही सूट एक लाखापर्यंत आहे. ही सूट फक्त सोन्याच्या दागिन्यांवर आहे. सोन्याचे कॉइन किंवा बिस्किट्स यासाठी शुल्क भरावं लागतं.