21 February 2019

News Flash

दिल्ली जिंकण्याचे मुंबईचे लक्ष्य!

बाद फेरीतील स्थानासाठी अखेरची लढत जिंकण्याची आवश्यकता

बाद फेरीतील स्थानासाठी अखेरची लढत जिंकण्याची आवश्यकता

इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) साखळी फेरी अखेरच्या टप्प्यात आली असताना बाद फेरी गाठण्याचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सुरुवातीच्या सामन्यांत हाराकिरी पत्करणारा संघ उत्तरार्धात मात्र तेजाने तळपतो, हे यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रविवारी दुबळ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धची अखेरची साखळी लढत जिंकून बाद फेरी गाठण्याचे लक्ष्य मुंबईसमोर आहे.

मुंबई इंडियन्सची निव्वळ धावगती +०.३८४ आहे. पण तरीही विजयासह ही धावगती उत्तम राखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. गेल्या काही सामन्यांमधील मुंबई इंडियन्सची कामगिरी पाहता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा गतविजेता संघ बाद फेरीत निश्चित स्थान मिळवू शकेल.

आयपीएलमध्ये मुंबईची सुरुवात खराब झाली. मात्र ज्या वेळी विजय महत्त्वाचे होते, तेव्हा या संघाने नेत्रदीपक विजयी घोडदौड केली. दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी प्रतिष्ठा टिकवण्याच्या दृष्टीने अखेरच्या सामन्यातील विजय महत्त्वाचा असेल. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने धडाकेबाज कामगिरी करताना मुंबईला एक प्रकारे सावधानतेचा इशाराच दिला आहे. या दोन संघांमधील आधीच्या सामन्यात दिल्लीनेच ७ विकेट राखून विजय मिळवला होता. ती लढत अखेरच्या षटकापर्यंत रंगली होती.

मुंबईच्या फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव जाणवत आहे. कर्णधार रोहित शर्माला यंदाच्या हंगामात एकूण २७३ धावाच करता आल्या आहेत. रोहितने बेंगळूरुविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला होता. याव्यतिरिक्त त्याच्याकडून अपेक्षांची पूर्तता झालेली नाही. पंजाबविरुद्धच्या सामन्यात किरॉन पोलार्डच्या घणाघाती शतकामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली होती. सलामीवीराच्या भूमिकेला सूर्यकुमार यादव (५०० धावा) आत्मविश्वासाने न्याय देत आहे. वेस्ट इंडिजचा इव्हिन लेविससुद्धा (३३४ धावा) त्याला तोलामोलाची साथ देत आहे.

याशिवाय हार्दिक आणि कृणाल हे पंडय़ा बंधू अखेरच्या षटकांमध्ये योगदान देऊन मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हार्दिकच्या खात्यावर एकूण २३३ धावा आणि १८ बळी आहेत, तर कृणालने २२४ धावा आणि ११ बळी घेतले आहेत. शेवटच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर दडपण आणण्यात वाकबगार असलेल्या जसप्रीत बुमराने (१६ बळी) मागील सामन्यात तीन बळी घेण्याची किमया साधली होती.

दिल्लीसाठी आणखी एक हंगाम झगडणारा ठरला. यंदाच्या हंगामात हा संघ तळाच्या स्थानावर आहे. रिकी पाँटिंगसारखा प्रशिक्षक आणि स्पध्रेच्या मध्यावर श्रेयस अय्यरकडे दिलेले नेतृत्व यामुळेसुद्धा दिल्लीला सूर गवसला नाही. विजय शंकर आणि हर्षल पटेल यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने चेन्नईविरुद्ध ५ बाद १६२ धावा केल्या. त्यानंतर लेग-स्पिनर अमित मिश्रा (२/२०) आणि युवा संदीप लॅमिछाने (१/२१) यांनी चेन्नईला ६ बाद १२८ धावसंख्येपर्यंत सीमित ठेवले.

  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स

First Published on May 20, 2018 2:01 am

Web Title: mumbai indians eye win against delhi daredevils